मालवण तालुका कॉग्रेसची गृहराज्यमंत्री (शहर) सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरात सध्या अवैध धंद्यांचे लोण पसरले असून काही धनदांडगे युवा पिढीला हेरून त्यांच्या मार्फत गांजा, अपू या नशील्या पदार्थां बरोबरच गोवा बनावटीची दारू व लिक्विड पासून बनविलेली दारु, जुगार अड्डा हे धंदे किनारपट्टीसह आजूबाजूच्या भागात राजरोस सुरू असून याबाबत कारवाई करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला द्यावेत अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेस मालवण शहराच्या वतीने राज्याचे गृह राज्यमंत्री (शहर) गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री श्री. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्यमंत्री सतेज पाटील यांची मालवण राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष साईनाथ चव्हाण, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदेश कोयंडे, मालवण शहर अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, लक्ष्मीकांत परुळेकर, पल्लवी तारी आदी उपस्थित होते. राज्यमंत्री पाटील यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मालवण शहर हे पर्यटन दृष्ट्या विकसित झालेले आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर असून दरवर्षी मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला लाखो देशी विदेशी पर्यटक भेट देतात. पर्यटन व्यवसाय स्थिरावत असताना काही धनदांडगे युवा पीडिला हेरून गांजा, अपू तसेच गोवा बनावटीची दारू व लिक्विड पासून बनविलेली दारू, जुगार, मटका हे राजरोस पणे सुरू आहेत. या अवैध धंद्यांना खाकी वर्दीचा धाक राहिलेला नाही. शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून युवा सुशिक्षित तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळली आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी अवैद्य धंद्या विरोधात मोहीम उघडणे गरजेचे असून पोलीस यंत्रणेला कारवाई करण्याचे आदेश द्यावेत व अवैद्य धंद्याचे उच्चाटन करावे अशी मागणी मालवण राष्ट्रीय काँग्रेसने राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान, याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही ना. पाटील यांनी दिली
