बॅ. नाथ पै यांच्या विचारांची उजळणी करून कामाला लागणे आवश्यक – प्रा. आनंद मेणसे

*⚡मालवण ता.२५-:* आज देशातील लोकशाही व्यवस्था अप्रत्यक्षपणे व्यवस्था धोक्यात आली आहे. लोकशाही मूल्ये नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करणे, त्यांच्या विचारांची उजळणी करून कामाला लागणे, अर्थव्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे. या अरिष्टाला भिडणारे निस्पृह आणि धाडसी जे त्याग करायला तयार आहेत. अशा कार्यकर्त्यांची फौज येत्या काळात तयार करावी लागेल. याची सुरवात सेवांगणच्या प्रांगणात करूया, असे प्रतिपादन साथी प्रा. आनंद मेणसे यांनी मालवण येथे बोलताना केले. बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण मालवण तर्फे आयोजित कार्यक्रमांचा शुभारंभ आज सेवांगणच्या दादा शिखरे सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते साथी प्रा. आनंद मेणसे यांच्यासह बॅ. नाथ पै यांची नात लेखिका अदिती पै, सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, सुरेश ठाकूर, नितीन वाळके, रुजरिओ पिंटो, ऍड. संदीप निंबाळकर, आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. मेणसे यांच्या ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘बॅ. नाथ पै’ या पुस्तकाच्या लेखिका अदिती पै यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोना लॉकडाऊन काळात सेवांगण तर्फे घेण्यात आलेल्या विविध ऑनलाईन स्पर्धेतील निवडक विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा. मेणसे म्हणाले, गांधीजींचा आणि सानेगुरूजींचा विचार या विचारातून निर्माण झालेले बॅ. नाथ पै सेवांगण हे त्याचे अपत्य याची दखल आपण घेतली पाहिजे. हे करताना चळवळ करत राहायची, संघर्ष करत राहायचा. नाथ पै यांनी स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, सीमा प्रश्‍न, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले. देशातील सामान्य माणसांचे विचार त्यांनी संसदेत मांडले. आज देशात जे विद्यमान सरकार आहे. त्या विद्यमान सरकारने छुप्या मार्गाने संपूर्ण शिक्षणाचे खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण वाटचाल हा फार मोठा देशाला धोका आहे. आज बॅ. नाथ पै यांची गरज वाटत आहे. ते असते तर या विषयावर त्यांनी रान उठविले असते, आज रेल्वे, बंदरांची, एअरपोर्ट, खाण उद्योग, पेट्रोलियमची विक्री होत आहे. गॅसचा दरही वाढत आहे हे होत असताना देशात उठाव होत नाही ही चिंतेची बाब आहे. आज नाथ पै यांच्यासारख्या वक्त्यांची गरज आहे. लाखांच्या सभा घेऊन त्यांच्यात स्फुुर्लिंग निर्माण करण्याचे काम त्यांनी केले असते, असेही प्रा. मेणसे म्हणाले. यावेळी अदिती पै म्हणाल्या, बॅ. नाथ पै हे केवळ एक राजकारणी नव्हते तर समाजकारणाद्वारे समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व होते. सेवांगण म्हणजे बॅ. नाथ पै यांच्या विचारांचे स्मारक आहे. बॅ. नाथ पै व साने गुरुजी यांच्या विचारांना धरूनच सेवांगण आपले कार्य करत आहे. कोरोना महामारी व महापुराच्या वेळी सेवांगणने केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश ठाकूर यांनी केले. हा कार्यक्रम कोरोना विषयक नियम पाळून करण्यात आला.

You cannot copy content of this page