सरपंच सुभाष लाड यांची मागणी
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डीकवल हद्दीतील गाव मौजे कुमामे या स्वतंत्र महसुली गावासाठी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कुमामे येथे स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर करावे, अशी मागणी गोळवण सरपंच सुभाष लाड यांनी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कुमामे गावात तीनशे मतदार आहेत. तसेच मतदान केंद्रासाठी सर्व सोईनी युक्त अशी शाळा गावच्या मध्यभागी उपलब्ध आहे. येथील मतदारांना नांदोस गडकरिवाडी येथे मतदानासाठी जावे लागत आहे. हे अंतर सुमारे पाच किमी असून जेष्ठ व आबालवृद्ध, अपंग मतदारांना मतदान केंद्रावर जाणे गैरसोईचे ठरते. सद्य स्थितीत कोरोना महामारीत योग्य अंतर राखणे, गर्दी कमी करणे आदी गोष्टींचा विचार करून कुमामे जि. प. शाळा येथे स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे गावातील सर्व मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान टक्केवारी सुद्धा वाढणार आहे. तरी सर्व बाबींचा विचार करून कुमामे साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सुभाष लाड यांनी केली आहे.
