बंदर अधिकारी-जलक्रीडा व्यवसायिकांत तू तू मै मै

एक खिडकी योजनेवरून वादंग

मालवण (प्रतिनिधी) मालवण पोलिसांनी बोलाविलेल्या बंदर जलक्रीडा व्यावसायिकांच्या बैठकीत जलक्रीडा व्यवसायिकांनी एक खिडकी योजना राबविण्याबाबत केलेल्या मागणीवर बंदर अधिकारी व व्यावसायिक यांच्यात तू तू – मै मै होऊन यासाठी पुढाकार घेण्याबाबत दोघांनीही एकमेकांवर बोटे दाखवली. यामुळे समान दर निश्चित होण्यासाठी आवश्यक असलेल्या एक खिडकी बाबत कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही. दरम्यान, जलक्रीडा व्यावसायिकांच्या वेगवेगळ्या दराबाबत तक्रारी प्राप्त होत असून पोलिसांनाही कारवाईचे अधिकार आहेत, जलक्रीडा करताना दुर्घटना घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस आपल्या अधिकारात योग्य ती कारवाई व्यावसायिकांवर करतील, त्यामुळे नियमात राहून व्यवसाय करावा, कारवाईस भाग पाडू नये तसेच पर्यटकांच्या जीवाशी खेळू नये, असा स्पष्ट इशारा यावेळी मालवणचे पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांनी देतानाच तशा आशयाच्या नोटिसाही उपस्थित व्यावसायिकांना बजावल्या. मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांनी वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हींग, बोटिंग आदी सर्व जलक्रीडा व्यवसायिकांची बैठक बोलावली होती. पोलीस वसाहत येथील सिद्धिविनायक सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, उपनिरीक्षक नितीन नरळे, बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, बंदर अधिकारी अमोल ताम्हणकर यांसह दामू तोडणकर, सहदेव साळगावकर, राजन कुमठेकर, बाबुराव चोपडेकर, मनोज खोबरेकर, सुनील झाड, प्रवीण कुबल, सचिन गोवेकर, समीर सारंग, भूषण परुळेकर, योगेश मंडलिक, रमेश कद्रेकर, संतोष परब, नेपोलियन फर्नांडिस, पांडुरंग कासवकर, स्वप्निल साळगावकर, अजित आचरेकर, सीमाव फर्नांडिस आदी जलक्रीडा व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी जलक्रीडा व्यावसायिक दामू तोडणकर यांनी वेगवेगळ्या दराने जलक्रीडा व्यवसाय होत असल्याने मेरिटाईम बोर्डाने याबाबत ठोस भूमिका घेऊन व्यावसायिकांची एक खिडकी योजना राबवावी अशी मागणी केली. तसेच यापूर्वी व्यवसायिकांनी केलेल्या एक खिडकी पद्धतीमध्ये एका व्यावसायिकाने नियम डावलून वेगळ्या दराने व्यवसाय चालू केला असताना त्यावर बंदर विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने ती एक खिडकी योजना बंद पडली असा आरोपही दामू तोडणकर यांनी केला. याबाबत बोलताना बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर व बंदर अधिकारी अमोल ताम्हणकर यांनी प्रत्येक व्यावसायिकाला मेरीटाइम बोर्डाकडून पॉलिसीप्रमाणे दर निश्चित करून देण्यात आले आहेत. त्या दराच्या वर कोणत्याही व्यावसायिकाला ज्यादा दर आकारता येणार नाही. एक खिडकी योजना ही व्यावसायिकांनीच एकत्र येऊन आपल्या स्तरावर राबवायची आहे. त्यातून फुटून कोणी वेगळ्या दरात व्यवसाय करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची कोणतीही तरतूद नाही, असे सांगितले. मात्र विनापरवाना, विना नोंदणी, कागदपत्रे अपुरी ठेवून आणि नियम डावलून कोणी व्यवसाय करत असल्यास त्यावर कारवाई बंदर विभाग करू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. जलक्रीडा व्यवसायातील दरामधील तफावतीमुळे पर्यटकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यातून होणारे वाद टाळण्यासाठी व्यवसायिकांनीच एकत्र येऊन समान दर निश्चित करून एक खिडकी योजना राबवावी, त्यास पोलिसांचाही पाठिंबा मिळेल, हेवेदावे न करता व्यवसाय टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी व्यावसायिकांनी एक होऊन यातून मार्ग काढावा, असे यावेळी पोलीस निरीक्षक ओटवणेकर यांनी सांगितले. यावेळी मालवण पोलीस ठाण्यामार्फत उपस्थित व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या. योग्य त्या प्राधीकरणाचा परवाना प्राप्त करून जलक्रीड़ा पर्यटनाचा अधिकृत परवाना असताना देण्यात आलेल्या अटी शर्थीचे पालन करून पर्यटकांचे सुरक्षीततेची परिपूर्ण काळजी घेऊन जलक्रीड़ा पर्यटन व्यवसाय करावा. विनापरवाना तसेच बंदी कालावधी असताना जलक्रीडा प्रकारचे मुदतीत कोणताही अनुचीत प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा भंग झाल्यास त्यास संबंधीतास जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसीत पोलीस निरीक्षक ओटवणेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page