काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांची राज्याचे ऊर्जामंत्री, ऊर्जा सचिव यांच्याकडे मागणी
मालवण (प्रतिनिधी) मालवणात वीज वितरण कंपनीकडून वीज बिल वसुली बाबत चुकीची कार्यवाही सुरू असून ग्राहकांना कोणतीही नोटीस न देता वीज कनेक्शन तोडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या या अनागोंदी कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री व ऊर्जा सचिव तसेच वीज वितरणच्या मुख्य कार्यालयाकडे केली असल्याची माहिती काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे नागरिक आर्थिक अडचणीत असून हॉटेल व इतर व्यवसाय बंद आहेत. अशा स्थितीत वीज बिल भरणा करण्याबाबत वीज वितरण कंपनीने कोणतीही सवलत दिलेली नाही. मालवण मधील वीज वितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी वीज बिल वसुली साठी वीज कनेक्शन तोडण्याच्या धमक्या देत आहेत. विद्युत कायद्यानुसार वीज कनेक्शन तोडण्याबाबत ग्राहकाला १५ दिवसांची लेखी नोटीस देणे आवश्यक असून त्याशिवाय थकीत बिलासाठी वीज कनेक्शन बंद करता येत नाही. असे असताना मालवणात वीज कंपनीचा अनागोंदी कारभार सुरू आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी उर्जामंत्र्यांकडे केली आहे. वीज बिल वसुली साठी ग्राहकांना नोटीस न देता वीज कनेक्शन तोडल्यास सेवादल काँग्रेसतर्फे उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, त्यास वीज वितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशाराही श्रीकृष्ण तळवडेकर यांनी दिला आहे.
