चक्क पुलाखाली जाऊन केले आंदोलन

कोळंब पुलाखालील माती काढा;काँग्रेस व पारंपरिक मच्छिमारांनी छेडले आंदोलन

मालवण दि प्रतिनिधी कोळंब पुलाखालील खाडीतील मातीचा भराव काढण्याच्या मागणीसाठी मालवण मधील काँग्रेस पदाधिकारी व पारंपारिक मच्छीमार यांनी पुलाखाली खाडीच्या पाण्यात उतरून तीव्र आंदोलन छेडले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी नोव्हेंबर मध्ये मातीचा भराव काढण्याचे काम करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मालवण- देवगड मार्गावरील कोळंब पुलाच्या दुरुस्तीवेळी पुलाखाली टाकण्यात आलेला मातीचा भराव काम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षे उलटली तरी ठेकेदाराकडून काढण्यात न आल्याने हा भराव तात्काळ काढण्यात यावा या मागणीसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून काँग्रेसचे पदाधिकारी व मच्छीमार यांनी कोळंब पुलाखाली भरावाच्या ठिकाणी खाडी पात्रात उतरून आंदोलन छेडले. या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष संदेश कोयंडे, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, शहर अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, जिल्हा युवक सचिव योगेश्वर कुर्ले, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा मेडिस, बबन कोयंडे, श्रेयस माणगांवकर, महादेव पाटील, प्रथमेश राऊत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मालवणचे पोलीस कर्मचारीही आंदोलन स्थळी दाखल झाले होते. यावेळी अरविंद मोंडकर यांनी आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करताना कोळंब पुलाच्या दुरुस्तीवर कोट्यावधी रुपये खर्च झाले. तरीही पुलाचे काम बोगस पद्धतीने झाले आहे. पुलाखाली टाकलेल्या भरावामुळे खाडी पात्राच्या प्रवाहावर परिणाम होऊन माशांची संख्याही घटली असून खाडीपात्रातील मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. मच्छीमारांबवर उपासमारीची वेळ आली आहे. भरावामुळे खाडीतील पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने पावसात पूरजन्य स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे हा भराव तात्काळ काढण्यात यावा अशी मागणी यावेळी अरविंद मोंडकर यांनी केली. तसेच संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे करण्यात येणार आहे असेही मोंडकर यांनी सांगितले. पुलाखाली टाकलेला भराव काढलेला नसतानाही ठेकेदाराला बिल कसे अदा करण्यात आले, याबाबत बांधकाम विभागातील अभियंत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी संदेश कोयंडे यांनी केली. या आंदोलन स्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. पाटील व उपअभियंता नितीन दाणे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मातीचा भराव न काढल्या बाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून नोव्हेंबर मध्ये हा भराव काढण्यात येईल असे आश्वासन यावेळी अभियंत्यांनी दिले. या आश्वासनानंतर काँग्रेस पदाधिकारी व मच्छीमारांनी आपले आंदोलन दुपारनंतर स्थगित केले.

You cannot copy content of this page