बिबट्यांनी केली कोंबडीची शिकार…

गावात भीतीचे वातावरण

वैभववाडी प्रतिनिधी पहाटेच्या सुमारास कोंबडीची शिकार करणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना सोमवारी पहाटे 4 वा. च्या सुमारास कोकिसरे पालकरवाडी येथे रामचंद्र गावडे यांच्या घरी घडली आहे. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. रामचंद्र लक्ष्‍मण गावडे यांच्या घरातील पाठीमागच्या पडवीत कोंबड्या होत्या. सकाळी त्यातील एक कोंबडी गायब झाल्याचे गावडे यांच्या लक्षात आले. कोंबडी फटकु-याने पळवली असावी असा अंदाज व्यक्त करत रामचंद्र गावडे यांचा मुलगा सिद्धू गावडे यांनी सीसीटीव्ही चेक केले. दरम्यान सीसीटीव्हीत 03:58 वा. सालवा डोंगराच्या दिशेने बिबट्या घरातील पडवीच्या दिशेने येत असल्याचे दिसत आहे. पुढे येत त्याने पडवीत प्रवेश केला. त्यानंतर खुराड्यावर बसलेल्या कोंबडीकडे त्याचे लक्ष गेले. बिबट्याने कोंबडीवर झडप घातली. ती पळत असताना बिबट्याने तीला उचलली. व आलेल्या वाटेने बिबट्या मार्गस्थ झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रामचंद्र गावडे यांच्या घराजवळून खांबाळे – कोकिसरे मार्ग जातो. गावडे यांनी रस्त्यावर स्वखर्चाने दिवाबत्तीची सोय केली आहे. ती लाईट रात्रभर सुरू असते. तसेच गावडे यांच्या घरात 11 जण राहतात. बाजूला दोन तीन घरी आहेत. वस्तीत बिबट्या घुसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page