आमदार दीपक केसरकर हे एक मनोरंजन केंद्र

एकनाथ नाडकर्णी यांची उपहासात्मक टीका

*⚡दोडामार्ग ता.२१सुमित दळवी-:* तिलारीत मनोरंजन केंद्र उभारून तीन लाख रोजगार निर्माण करणारे आमदार दीपक केसरकर स्वतःच एक मनोरंजन केंद्र बनत चालले आहेत, अशी उपहासत्मक टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केली. आमदार केसरकर यांनी तिलारीत आमयुझमेंट पार्क उभारून ३ लाख रोजगार निर्माण करणार असल्याचे जाहीर केले. केसरकरांच्या या वक्तव्याचा श्री. नाडकर्णी यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की ‘ आमदार केसरकर यांच्या तथाकथित रोजगार निर्मितीचा प्रवास १२ वर्षांपूर्वीपासून काथ्या उद्योगातून सुरु झाला. आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये त्यांनी मतदार संघातील महिलांना काथ्या उद्योगातून रोजगार देणार असे प्रलोभन दाखवले. मात्र मंत्री बनल्यानंतर देखील त्यांना हजार महिलांना रोजगार देता आला नाही. मंत्री झाल्यानंतर चष्मा कारखाना, आयटी पार्क अशा अनेक घोषणा झाल्या. आता डबल भिंगाचे चष्मा लावून त्यांचे हे रोजगार प्रकल्प शोधण्याची वेळ आलीय. माझ्या एका शब्दावर नारायण राणे साहेबांनी सात वर्षांपूर्वी आडाळी एमआयडीसी मंजूर केली. शेतकऱ्यांनी वर्षभरात जमिनी दिल्या. आज येथे उद्योग येण्यासाठी स्थानिक स्वतः उद्योजकांशी संपर्क साधून प्रयत्न करतायत. मात्र पाच वर्षे मंत्री राहिलेल्या केसरकरांना हे औद्योगिक क्षेत्रही विकसित करता आले नाही. आमदार असल्यापासून माटणेत मिनी एमआयडीसी आणत होते. मात्र आडळीतील एमआयडीसी विकसित करणे त्यांना जमले नाही. आता पुन्हा बांदा -दोडमार्ग परिसरात औषधं कारखाना उभारणार अशा घोषणा सुरु आहेत. रात्री झोपल्यावर यांना स्वप्न पडतात, मग सकाळी उठल्या उठल्या ते सर्वाना सांगत बसतात. आज स्वप्नात मी हा कारखाना आणला. तिलारीच्या धरण क्षेत्रात जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प आणणार हे केसरकरांचे भव्यदिव्य स्वप्न आहे. गेली अनेक वर्षे ते यावर काम करत असावेत. आता त्यांना तिलारीत मनोजरंजन केंद्र उभारण्याची उचकी लागली आहे. गेल्या दहा वर्षात ज्या केसरकारांना साधा बांदा -दोडामार्ग रस्ता करता आला नाही, त्या केसरकरांनी तीन लाख रोजगार देण्याचे भव्यदिव्य काहीतरी स्वप्न बघावे, म्हणजे विनोदच आहे. आडाळी एमआयडिसित किमान तीन हजार तरुणांना रोजगार देता आला असता, तिथे तीनशे जणांना काम दिले असते तरी केसरकरांची स्वप्नपूर्ती झाली असती. एखादा आमदार किती निष्क्रिय असू शकतो, याचे उदाहरण द्यायचे झाले तर पुढच्या ५० वर्षात तरी आमदार केसरकरांचेच द्यावे लागणार आहे. तिलारीत मनोरंजन पार्क उभारणारे केसरकर जनतेसाठी स्वतःच एक मनोरंजन केंद्र बनले आहेत. उगाच हवेतल्या विकासात न फिरता केसरकरांनी जमिनीवर येऊन काम करावे. आज जनता हैराण आहे. तालुक्यातील रस्ते दयनीय आहेत . आरोग्य व्यवस्था अस्तित्वात नाही. पाणी व्यवस्था मोडकलीस आल्यात. स्थानिकन कामं नाही. रोजगार गेलाय. अशावेळी स्थानिक आमदारांनी जनतेच्या पाठीशी राहायला हवं. त्यांना दिलासा द्यायला हवा. असे असताना केसरकर मनोरंजनाचे खेळ करत बसले आहेत. त्यांच्या वरिष्ठानी तरी त्यांचे खेळ बंद करावेत. जनता केसरकरांच्या कारभाराला कंटाळली आहे. काथ्यापासून सुरु झालेली केसरकरांची रोजगार यात्रा गेल्या बारा वर्षात मनोरंजन केंद्रपर्यंत पोहचली. आता केसरकरांनी स्वतःहून सन्मानाने यात्रेला थांबा द्यावा. अन्यथा जनताच त्यांच्या यात्रेला ब्रेक लावेल.

You cannot copy content of this page