तहसीलदार रामदास झळके यांचे आवाहन
वैभववाडी प्रतिनिधी पीक नोंदणीचे फायदे शेतकऱ्यांना भविष्यात अनेक आहेत. नैसर्गिक आपत्ती अनुदान, पिक कर्ज, विमा आदी लाभ घेण्यासाठी शासनाकडे या नोंदणीमुळे खातेनिहाय व पीकनिहाय डाटा उपलब्ध होणार आहे. पीक नोंदणी अगदी साध्या, सोप्या व मराठी भाषेत करता येणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी गावात कार्यरत असणारा तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी केले आहे. नाधवडे येथे ई-पीक पाहणी व नोंदणीचा शुभारंभ तहसीलदार झळके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, बाबा कोकाटे, तलाठी वैभव कराड, रोहित पावसकर, उपसरपंच सूर्यकांत कांबळे, वैभव कोकाटे, गोपाळ कोकाटे, श्री पावसकर, महादेव तानवडे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसीलदार झळके यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या अँड्रॉइड मोबाईल वर पाहणी ॲप डाऊनलोड करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल नाहीत त्यानी इतर मोबाईलवरुन आपल्या शेतीची माहिती भरून नोंदणी करता येईल. एका मोबाईल वरून वीस खातेदारांच्या नोंदणी करणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी माहिती भरल्यानंतर तलाठी ती माहिती तपासणार आहेत. व त्यानंतर अद्यावत करणार आहे. झळके पुढे म्हणाले, नोंदणीची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. त्यापूर्वी पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक आहे. कालावधीत नोंदणी न केल्यास ते लागवडीचे क्षेत्र पड दिसणार आहे. त्याचा तोटा भविष्यात शेतकऱ्यांना होणार आहे. जमीन पड दिसल्यास शासनाच्या अनुदानाचा लाभ घेताना मर्यादा येणार आहेत असे सांगितले. प्रगतशील शेतकरी व युवा पिढीतील शेतकऱ्यांनी या योजनेत पुढाकार घ्यावा व गावातील शेतकरी पीक नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे असे सांगितले.
