आरोग्य समिती सभेत निर्णय
*⚡सिंधुदुर्गनगरी ता २१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमबीबीएस डॉक्टरांची ५० टक्के हून अधिक पदे रिक्त असल्याने जोपर्यंत नवीन डॉक्टर येत नाहीत तोपर्यंत बदली झालेल्या कार्यरत डॉक्टरांना कार्यमुक्त करू नये, तसेच त्यांचे वेतन रोखण्यात येऊ नये. असा ठराव आजच्या आरोग्य समिती सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती डॉ.अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, समिती सदस्य लॉरेन्स मान्येकर, प्रितेश राउळ, हरी खोबरेकर आदींसह खातेप्रमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सद्यस्थितीत केवळ ११ एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहेत. काही डॉक्टरानी विनंती बदली मागितली आहे. अशी माहिती सभेत देण्यात आली असता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड सह अन्य साथ रोगाची परिस्थिती लक्षात घेता जोपर्यंत रिक्त जागांवर नवीन एमबीबीएस डॉक्टर येत नाहीत तोपर्यंत बदली झालेल्या डॉक्टरांना कार्यमुक्त करु नये. तसेच त्यांचे वेतन रोखण्यात येऊ नये. असा ठराव आजच्या आरोग्य समिती सभेत घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आतापर्यंत एकूण १८ नव्या ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्या आहेत. तर आणखी ११ ॲम्बुलन्स मिळणार आहेत त्यामुळे ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी २९ ॲम्बुलन्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या जुन्या ॲम्बुलन्स शासनाला परत कराव्या लागणार आहेत आणि जर या कार्यरत ठेवायच्या असतील तर त्यासाठी आवश्यक असलेले वाहन चालक, डिझेल व मेंटनस खर्चासाठी निधी लागणार आहे.तो उपलब्ध होणे आवश्यक आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी सभागृहात दिली. तर सध्या कार्यरत असलेल्या जुन्या ॲम्बुलन्स शासनाला परत करण्याबाबतचा निर्णय तातडीने घेऊ नये. याबाबत सर्वसाधारण सभेत चर्चा करून निर्णय घेण्यात यावा. अशी सूचना सभापती डॉ. अनीषा दळवी यांनी केली. सिंधुदुर्गनगरी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या औषध भंडारा मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.अशी सूचना मागील सभेत करण्यात आली होती ,त्यानुसार सीसीटीव्ही बसवण्यासाठी अंदाजीत १ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अशी माहिती सभेत देण्यात आली तर आवश्यक निधीची जिल्हा नियोजन कडे मागणी करावी अशी सूचना आजच्या सभेत सदस्यानी केली. तसेच जिल्ह्यासाठी नव्याने उपलब्ध झालेल्या ॲम्बुलन्स सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी शेड बांधण्याची यावी अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. जिल्ह्यात परिचारांच्या ११७ जागा रिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर परिचर यांच्या ३९३ मंजूर पदांपैकी २७६ पदे भरण्यात आली आहेत तर अद्यापही ११७ परिचर यांच्या जागा रिक्त आहेत मात्र सद्यस्थितीत शासनाकडून परिचर यांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात नाही. अशी माहिती सभेत देण्यात आली. मायनिंगमुळे अनेक पाणीस्रोत दूषित दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंग प्रकल्पातील अनेक पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहेत .मात्र संबंधित ठेकेदाराकडून तेथील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तरी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले शुद्ध पाणी पुरवठा करण्याची यंत्रणा उभारण्यात यावी. असा ठराव आजच्या आरोग्य समिती सभेत घेण्यात आला तसेच या भागातील जास्तीत जास्त पाणी नमुने घेऊन तपासणी करण्यात यावेत अशी सूचना केली.
