*⚡मालवण ता.१८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असून केंद्रीय स्तरावर पर्यटन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या जिल्ह्यात आणि कोकणातही रोजगाराभिमुख कोणते प्रकल्प आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि हे करताना सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाला सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना दिल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज पडवे येथील मेडिकल काॅलेजमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यानी भेट घेऊन महासंघाच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी मालवण येथे होणाऱ्या जागतिक पर्यटन दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी ना. राणे यांनी निमंत्रण स्विकारले. मात्र काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकत नसल्याने आपण ऑनलाईन कार्यक्रमात निश्चित सहभागी होणार असल्याचे सांगितले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, सचिव ऍड. नकुल पार्सेकर, उपाध्यक्ष डि. के. सावंत, साहसी पर्यटन प्रमुख कमलेश चव्हाण, सावंतवाडी अध्यक्ष जितेंद्र पंडित, मालवण अध्यक्ष अविनाश सामंत आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यानी रापण संघ आणि हाॅटेल व्यवसायिकांच्या समस्या ना. राणे यांच्या समोर मांडल्या. सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेत राणे यांनी जिल्ह्यातील हाॅटेल व्यवसाय, साहसी पर्यटन, कृषी पर्यटन, निवास न्याहारी, आदरातिथ्य अशा अनेक विषयांवर इतर देशातील पर्यटनाचा संदर्भ देवून मार्गदर्शन केले.
पर्यंटन महासंघाला सर्वोतोपरी मदत केली जाईल – केंद्रीय मंत्री नारायण राणे
