आंबोली ग्रामस्थांची शाखा अधिकारी यांच्याजवळ निवेदनाद्वारे मागणी
*⚡आंबोली ता.१८-:* आंबोली येथील बँक ऑफ इंडियाचे हटविण्यात आलेले पैसे काढण्याचे एटीएम मशीन लवकरात लवकर बसवावे, अशी मागणी आंबोली ग्रामस्थांनी बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले की, आंबोली येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन बसविले होते. मात्र हा करार संपल्याने येथील मशिन काढून टाकण्यात आले आहे. त्याच ठिकाणी बँक ऑफ इंडिया आंबोलीचे पैसे भरणा मशीन बसविण्यात आले.आहे. तेथे पैसे भरणा करण्याचे प्रमाण खूप कमी असून पैसे काढण्याचे प्रमाण जास्त आहे. चौकुळ आंबोलीमध्ये लोकवस्ती सर्वसाधारण २० ते ३० हजार असून पैसे काढण्याचे प्रमाण खूप आहे. तसेच सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग हे आंबोलीपासून पस्तीस किलोमीटर तरकोल्हापूर जिल्ह्यातील आजरा हे ठिकाण पस्तीस किलोमीटर आहे. या परिसरात व्यतिरिक्त एकही एटीएम मशीन नाही. तसेच आंबोली हे पर्यटन ठिकाण असल्याने लोक मोठ्या प्रमाणावर पैसे काढत असतात. यामुळे येथील एटीएम काढल्याने गावातील व गावाबाहेरील लोकांचे तसेच पर्यटकांचे पैसे काढणे अडचणीचे ठरले आहे. तरी ही समस्या लक्षात घेऊन पैसे काढण्यासाठी एटीएम मशीन लवकरात लवकर बसवावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. या निवेदनावर दत्ताराम बांदेकर, विश्वंभर राऊळ, मायकल डिसोजा, उत्तम नार्वेकर, दत्ताराम नार्वेकर, सुनील बांदेकर, जयराम राणे, हेमंत नार्वेकर, श्याम गावडे, अभय गावडे, झुजे डिसोजा, भूषण जोशी, कौस्तुभ नार्वेकर, अजित नार्वेकर, गुणाजी गावडे, धोंडीराम गावडे, संजय परब, उमेश गावडे, प्रवीण नाटलेकर, नारायण चव्हाण, जगजीवन पारधी, रोहित पारधी अनिल चव्हाण आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
