रस्त्याच्या मधोमध ट्रक बंद पडल्याने एकेरी वाहतूक सुरू

करूळ घाटातील प्रकार

वैभववाडी प्रतिनिधी करुळ घाटात रस्त्याच्या मधोमध मालवाहतूक करणारा ट्रक बंद पडल्यामुळे घाटमार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे.सद्यस्थितीत घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे. सकाळी ६ वा हा प्रकार घडला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगाच रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक भुईबावडा व फोंडा घाटमार्गे वळविली आहे. करूळ घाटात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या मध्यभागी माल भरलेला ट्रक बंद पडला.त्यातच ट्रकच्या पाठोपाठ आणि समोरून मोठ्या प्रमाणात वाहने आल्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली.वाहतुक ठप्प झाल्यामुळे करूळ घाटरस्त्यात शेकडो वाहने अडकली.चार पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.घाटातील वाहतुक ठप्प झाल्याचे समजताच तहसीलदार रामदास झळके,पोलीस निरीक्षक अतुल जाधव,पोलीस हवालदार विलास राठोड,पोलीस कर्मचारी प्रसाद पाटील,संतोष शिंदे,अजित पडवळ,दिग्विजय काशीद आदी घटनास्थळी पोहोचले. ट्रक चालकांशी चर्चा केल्यानंतर ट्रक तत्काळ सुरू होणार नाही हे पोलीसांच्या लक्षात आले. त्यामुळे वैभववाडीकडुन कोल्हापुरकडे जाणारी लहान वाहने भुईबावडा घाटाकडुन तर अवजड वाहने फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली. तब्बल दोन तासानंतर करूळ घाटात अडकलेली लहान वाहने पोलीसांनी ट्रकच्या बाजुला असलेल्या जागेतुन मार्गस्थ केली.मात्र मोठी वाहने उशिरापर्यत घाटरस्त्यामध्ये अडकली होती.साडेअकरा वाजेपर्यत ट्रकची दुरूस्ती झाली नव्हती.पोलीसांनी एडगाव तिठा येथे बॅरिकेटस लावुन रस्ता बंद केला होता.अकरा वाजल्यानंतर लहान वाहनांची वाहतुक पोलीसांनी सुरू केली.

You cannot copy content of this page