जलक्रिडा व्यवसाय सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी

जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केली मागणी

*⚡मालवण ता.१५-:* सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सुरू करण्यास ज्याप्रमाणे परवानगी दिली त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा जिल्ह्यातील जलक्रिडा व्यवसाय सुरू करण्यास देखील जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. राज्य सरकारने कोविड नियमाचे पालन करून जलक्रिडा व्यवसाय चालू करण्यासाठी स्थानिक जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनुसार जलक्रिडा व्यवसाय चालू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी किल्ला वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु सागरी पर्यटनासाठी येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांनां सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मुख्य आकर्षण असणाऱ्या जेट्स्कि, बंपर राईड, बनाना राईड, स्पीडबोट राईड, वॉटर स्कूटर या जलक्रिडाला परवानगी न दिल्यामुळे जिल्ह्य़ात आलेल्या पर्यटकांना या सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. गेले दीड वर्षापेक्षा जास्त काळ कोरोना व्हायरस मुळे जलक्रिडा पर्यटन व्यवसायीक आर्थिक संकटात आला असून दैनंदिन खर्च भागवणार कुठून हां यक्ष प्रश्न त्यांच्या समोर आहे. म्हणूनच यासंबंधी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून जलक्रिडा प्रकल्प चालू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. जलक्रिडा व्यवसायास परवानगी दिल्यास जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढीस मदत होईल व जलक्रिडा व्यावसायिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असेही बाबा मोंडकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page