दिड दिवसांच्या बाप्पाला कोरोना मुक्तीचे साकडे

मालवणात भावपूर्ण वातावरणात निरोप

*⚡मालवण ता.११-:* गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… असा जयघोष करत आणि कोरोनाच्या संकटातून जगाला लवकर मुक्त कर असे साकडे श्री गणेशाच्या चरणी घालत आज मालवणात दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यासह विविध विसर्जन स्थळी गणेशभक्तांनी गणेश मूर्त्यांचे विसर्जन करून लाडक्या गणरायाला निरोप दिला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काल गणेश चतुर्थी दिवशी मालवणात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले. कोरोनाच्या संकटातही गणेश भक्त दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, अकरा दिवस अशी बाप्पाची मनोभावे सेवा करणार आहेत. काल गणपतीचे आगमन झाल्यावर दीड दिवस त्याची मनोभावे पूजा अर्चा व सेवा करून आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यानिमित्त मालवण समुद्र किनाऱ्यावर बंदर जेटी परिसरात आज सांयकाळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी गणेश भक्तांची लगबग दिसून आली. गणरायाचा जयघोष करत तर कुठे छोटेखानी सवाद्य मिरवणूक काढत गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. बंदर जेटी बरोबरच चिवला बीच, दांडी किनारा, देऊळवाडा नाका येथील व्हाळ आदी व इतर विसर्जन स्थळी गणेश भक्तानी गणेश मूर्त्यांचे विसर्जन करत गणरायाला निरोप दिला. दीड दिवसांच्या गणेश मूर्त्यांच्या विसर्जनाच्या निमित्ताने मालवण पोलिसांनी बंदर जेटी परिसरासह ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. पोलीस कर्मचारी व होमगार्डस विसर्जनादरम्यान होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नजर ठेवून होते. बंदर जेटी परिसरात नगरपालिकेकडून लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. तर गणेश मूर्ती विसर्जनासाठी स्थानिक तरुणांचे सहकार्य गणेश भक्तांना मिळत होते.

You cannot copy content of this page