Headlines

आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांचे उद्या ठिय्या आंदोलन

*⚡ओरोस ता.०७-:* गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील २१ आरोग्य सेविकांना प्रशासनाने सेवेतून कमी केले आहे. या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्यावतीने बुधवारी ८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद समोर एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सर्व कर्मचारी-अधिकारी यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटना जिल्हाध्यक्ष हेमंदिप पाताडे यांनी दिली आहे.    २००५ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झाले. जिल्ह्यात ५५६ अधिकारी व कर्मचारी अभियान अंतर्गत कार्यरत आहेत. कंत्राटी स्वरूपात गेली १५ वर्षे कार्यरत असताना कोरोना विषाणू सारख्या महामारीत सुद्धा सेवा दिलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१ आरोग्य सेविकांना त्यांनी २०२९-२१ या कोविड काळात उपकेंद्र स्तरावर एकही प्रसूती केली नसल्याने व केंद्र सरकारने या पदांची वेतन रक्कम बंद केल्याचे कारण दाखवत सेवेतून कमी केले आहे. मात्र, ही पदे कमी न करता जिल्ह्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या उपकेंद्र स्तरावर समायोजन करण्याची वारंवार मागणी केली आहे.     याबाबत प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. गणपती पूर्वी कमी केलेल्या सेविकांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात यावेत. याबाबत लक्ष वेधण्यासाठी ८ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहेत, असे अध्यक्ष हेमंदिप पाताडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

You cannot copy content of this page