सिंधुदुर्गनगरी ता ०७ सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ३४,८४३ शेतकऱ्यांचे ३९८८.०२ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्याला १७ कोटी ३ लाख ८१ हजार एवढे अनुदान प्राप्त झाले.त्यापैकी आतापर्यंत १४ कोटी ५७ लाख ३१ हजार एवढे अनुदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती कृषी समिती सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद कृषी समितीची सभा उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, समिती सदस्य रणजित देसाई, अमरसेन सावंत ,सावी लोके आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्गात झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्यात आला होता. याबाबत शासनाकडून झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील ३४,८४३ शेतकऱ्याच्या नुकसानीपोटी जिल्ह्याला १७ कोटी ३ लाख ८१ हजार एवढे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत १४ कोटी ५७ लाख ३१ हजार एवढे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. काही तालुक्यात अद्याप शंभर टक्के अनुदान वाटप झालेले नाही. अशी माहिती सभेत देण्यात आली तर देवगड़ तालुक्यात १ कोटी ६२ लाख ७४ हजार निधीपैकी १ कोटी ६१ लाख ९० हजार वाटप, मालवण तालुक्यात २ कोटी ७३ लाख ४८ हजार प्राप्त निधीपैकी २ कोटी ३९ लाख ९५ हजार निधीचे वाटप, सावंतवाडी तालुक्यात ३ कोटी २६ हजार निधीपैकी २ कोटी ७१ लाख ७१ हजार निधीचे वाटप, दोडामार्ग तालुका ६१ लाख निधीपैकी ५१ लाख १६ हजार वाटप, वेंगुर्ला तालुका ३ कोटी ४२ लाख ४९ हजार निधीपैकी २ कोटी ९८ लाख ५० हजार अनुदान वाटप, कणकवली तालुका १ कोटी १ लाख ७० हजार प्राप्त निधीपैकी ९८ लाख २८ हजार वाटप, कुडाळ तालुका ३ कोटी ६२ लाख ९७ हजार निधीपैकी २ कोटी ३६ लाख ६४ हजार निधीचे वाटप झाले तर वैभववाडी तालुक्यात ९९ लाख १७ हजार प्राप्त निधी शंभर टक्के वाटप करण्यात आला आहे. अशी माहिती आजच्या कृषी समिती सभेत देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने झाल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पासून वंचित राहावे लागणार आहे. तरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पुन्हा पंचनामे करा असा ठराव घेण्यात आला होता. त्याचे काय झाले असा प्रश्न सभेत उपस्थित करण्यात आला मात्र आजच्या सभेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित न राहता त्यानी आपला प्रतिनिधी पाठविला होता. त्यामुळे सदस्यांना योग्य माहिती मिळाली नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अधीक्षक कृषी अधिकारी एस एन म्हेत्रे हे जाणीवपूर्वक सभा टाळत आहेत . प्रत्येक सभेत वेगवेगळा प्रतिनिधी पाठवून सभागृहाची दिशाभूल केली जात आहे. असा आरोप करत त्याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. असा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला. स्थानिक भाजी बियाण्यांचा समावेश करा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना भाजी बियाणेचे किट वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये चवळी, मिरची, मुळा, गवार ,मेथी, टोमॅटो, आदी बियाण्यांचा समावेश असणार आहे. मात्र या बियाणे मध्ये सुरण,कनगी, पड़वळ,शिराळी यासारख्या स्थानिक भाजी बियाण्यांचा समावेश करण्यात यावा. अशी सूचना सदस्य रणजीत देसाई यांनी केली.
तौक्ते वादळाची १४ कोटी ५७ लाख नुकसानी वाटप
