भाजपाने सिंधुदुर्गात उभारलेल्या कोविड केंद्रांचे 9 सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण

कोकणवासीयांना दिलेला शब्द खरा केला:आम.प्रसाद लाड

*⚡कणकवली ता.०७-:* कोविड साथरोगाचा संसर्ग वाढला असताना कोकणवासीयांना दिलेला शब्द खरा करत भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी ४ व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ३ कोविड-१९ केंद्रे उभारली असून त्यांचा भव्य लोकार्पण सोहळा रत्नागिरी येथे ८ सप्टेंबर व सिंधुदुर्गात ९ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. भाजप आणि ‘अंत्योदय प्रतिष्ठान’च्या माध्यमातून उभारलेल्या या सुविधांमुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील आरोग्य सुविधा भक्कम होणार असून त्यामुळे कोविड-१९च्या काळात नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती भाजप नेते आम.प्रसाद लाड यांनी दिली. आम. प्रसाद लाड म्हणाले,या कोविड केंद्रांचे उद्घाटन केंद्रीयमंत्री नारायण राणे, महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून ते दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित राहणार आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,माजी खास. निलेश राणे, माजी मंत्री व आम. रवींद्र चव्हाण, आम.निरंजन डावखरे, आम.रमेश पाटील, आम. भाई गिरकर, आम. नितेश राणे हे मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. ८ सप्टेंबर २०२१ रोजी रत्नागिरी येथे ४ कोविड केंद्रांचे उद्घाटन होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबर २०२१ रोजी सिंधुदुर्ग येथे ३ कोविड केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. रत्नागिरी येथील ही केंद्रे आबासाहेब मराठे हायस्कूल हातीवले, राजापूर; खंडाळा हायस्कूल, रत्नागिरी; महात्मा गांधी विद्यालय, साखरपा आणि लोकमान्य टिळक विद्यालय, दाभोळ या ठिकाणी आहेत. सिंधुदुर्ग येथील केंद्रे आयुर्वेदिक कॉलेज, सावंतवाडी; ग्रामीण रुग्णालय, देवगड; पॉलीटेक्निकल कॉलेज, मालवण येथे उभारली गेली आहेत. ही केंद्रे भाजपचे आमदार निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, रमेश पाटील आणि प्रसाद लाड यांच्या आमदार निधीतून उभारली गेली आहेत. त्यांना सौ. नीता प्रसाद लाड यांच्या ‘अंत्योदय प्रतिष्ठान’नेही आर्थिक हातभार लावला आहे.   आम.प्रसाद लाड यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना तीन महिन्यांपूर्वी येथील जनतेला आश्वासन दिले होते. कोविड-१९ रुग्णालये उभारून या जिल्ह्यांच्या विविध भागांमध्ये आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणवर सुधारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्या आश्वासनांची पूर्तता या रुग्णालय आणि कोविड केंद्रांच्या माध्यमातून केली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने ही केंद्रे उभारली गेल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. “ज्या ज्या वेळी कोकणावर संकट आले तेव्हा भाजप कोकणवाशीय बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे ऊभी राहिली आहे. नुकत्याच झालेल्या महापुराच्यावेळीसुद्धा हीच बाब प्रकर्षाने नमूद झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उभारणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातील काही याधीही दाखल झाल्या असून नवीन रुग्णालय व केंद्रांच्या माध्यमातून पुढील टप्पा या आठवड्यात पूर्ण होत आहे. आणखीही आरोग्य सुविधा आम्ही पुढील टप्प्यात दाखल करणार आहोत. कोविडची तिसरी लाट येवू नये, अशीच प्रार्थना ईश्वरचरणी राहील. पण ती आलीच तर या आरोग्य सुविधा महत्वाची कामगिरी पार पाडणार आहेत,” असे उद्गार यावेळी आम.प्रसाद लाड यांनी काढले. 

You cannot copy content of this page