मतदार संघाचा विकास करण्यात अपयश आल्याने प्रदीप नारकर यांचे ते आरोप नैराश्यातून.

जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांचा मत

*⚡ओरोस ता.०७-:* आपल्या साडेचार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या मतदारसंघांमध्ये कोणतेही ठोस विकासात्मक काम करू न शकणाऱ्या प्रदीप नारकर यांनी जिल्हा परिषदेवर केलेले आरोप नैराश्यातून केलेले आहेत. त्यामुळे हे आरोप दखल घेण्याजोगे नसल्याचे मत जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी व्यक्त केले. गेल्या साडेचार वर्षात प्रदीप नारकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सभेमध्ये विकासात्मक बाबींना विरोधाची भूमिका घेतली आहे. त्यांचा पक्ष राज्यात सत्तेत असताना देखील आपल्या मतदारसंघांमध्ये कोणतेही भरीव असे विकासाचे काम न करू शकल्यामुळे नैराश्याने ते जिल्हा परिषदेवर आरोप करत आहेत. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुपक्षी प्रदर्शन हे गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे होऊ शकले नाही. तसेच त्यापुर्वी देखील आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या घाणेरड्या राजकारणामुळे सदर प्रदर्शनाला दबावाखाली येऊन एसटी महामंडळाने जागा नाकारली होती. त्यामुळेच सातत्याने चार वर्षे घेतले गेलेले राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन जिल्ह्यात होऊ शकले नाही याचे खापर जिल्हा परिषदेवर फोडताना प्रदीप नारकर यांनी जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगायला हवी होती. गेल्यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारांकरिता जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले होते. मात्र कोरोनाच्या कालावधीत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होऊ न शकल्यामुळे गेल्या वर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द करण्यात आले होते. केवळ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच नव्हे तर राज्य सरकारने देखील आदर्श शिक्षक पुरस्कार याच पार्श्वभूमीवर रद्द केले होते याची माहिती प्रदीप नारकर यांनी घ्यावी. गेल्यावर्षी प्रस्ताव सादर करणारे शिक्षक हे या पुरस्कारांसाठी पात्र नाहीत असे जिल्हा परिषदेमार्फत कधी मत व्यक्त करण्यात आले नव्हते. मात्र केवळ आणि केवळ जिल्हा परिषदेची बदनामी करायची व वरिष्ठांना खूश करण्याकरता प्रदीप नेरकर हे वारंवार अशा प्रकारची विधाने करत असतात. जिल्हा परिषदेचा विकास निधी हादेखील संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच विभागात कमी अधिक संख्येने वितरित करण्यात येतो. त्यामुळे त्याला आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जिल्हा नियोजन समितीचा निधी देखील याच निकषांप्रमाणे वितरित करण्यात येतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निधीचे असमान वाटपाबद्दल बोलताना प्रदीप नारकर यांनी अगोदर पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधी वितरणाबाबत माहिती करून घ्यावी असा सल्ला देखील अंकुश जाधव यांनी दिला आहे. एकंदरीतच जिल्हा परिषदेच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आल्यामुळे साडेचार वर्ष मुग गिळून गप्प बसलेले शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य खोटेनाटे आरोप करून जिल्हा परिषद परिषदेची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मात्र जसे बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी अनेक खोटे आरोप करुन देखील मतदारांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत दिले तसेच पुढील निवडणुकांमध्ये देखील जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता असणार असे मत समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page