पाडलोस ग्रामपंचायतसह नागरिकांची मागणी ः आरोस, पाडलोसमधील प्रवाशांचे हाल
*💫बांदा दि.१७-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आलेली सातार्डा पाडलोसमार्गे सावंतवाडी (वस्तीची गाडी) एसटी बस वाहतूक सेवा सध्या अनलॉकमध्ये पुन्हा पूर्ववत सुरू करावी. सातार्डा ते सावंतवाडी दरम्यान अनेक गावांतील नागरिकांना सकाळ व संध्याकाळच्यावेळी घर गाठणे किंवा कामासाठी बाहेर पडणे कठीण होत आहे. त्यामुळे पाडलोस ग्रामपंचायतने सावंतवाडी एसटी आगार व्यवस्थापकांना लेखी पत्र देऊन सदर गाडी सुरू करण्याची मागणी केली. पाडलोस ग्रामस्थांसह शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक, पाडलोस युवासेना शाखाधिकारी रोहित गावडे तसेच निखील परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊन याचा एसटी बस वाहतुकीवरही झाला. बंद केलेल्या जिल्ह्याच्या सीमा, संचारबंदी यासारख्या निर्णयांमुळे एसटी बसेसची चाकेही थबकली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली. सावंतवाडी तालु्नयातील सातार्डा, साटेली, आरोस, दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, रोणापाल, मडुरा, शेर्लेसह बांदा, इन्सुली माजगावातील नागरिकांना सातार्डा पाडलोसमार्गे सावंतवाडी या वस्तीच्या गाडीचा मोठ्याप्रमाणात उपयोग होतो. आरोससारख्या ठिकाणी सावंतवाडीवरून जाण्यायेण्यासाठी एसटीवाहतूक सेवा नसल्याने प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी आगार व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, सावंतवाडी आगार व्यवस्थापकांनी ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांच्यात झालेल्या चर्चेत सातार्डा पाडलोसमार्गे सावंतवाडी गाडी सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे दहा ते बारा गावातील नागरिक सदर एसटी वाहतूक सेवा कधी सुरू होणार याच्याच प्रतिक्षेत आहेत.
