मत्स्य मार्केट गाळे लिलाव प्रकरणी तालुका व्यापारी संघाची भूमिका
*⚡वेंगुर्ला ता.०४-:* वेंगुर्ला मत्स्य मार्केट मधील नवीन गाळे वाटपाच्या ई लिलाव प्रक्रियेद्वारे जाणूनबुजून सदर जुन्या 15 गाळेधारकांना जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर वेंगुर्ला तालुका व्यापारी संघ त्यांच्याशी असहकार्याची भूमिका घेईल. मात्र जुन्या गाळेधारकांना त्यांचे गाळे त्यांना परत मिळाल्यास आपलेच व्यावसायिक बंधू आपल्याच व्यावसायिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, असा संदेश सर्वत्र जाईल. त्यामुळे सर्वांकडून चांगल्या अपेक्षा आहेत. असे आवाहन वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. वेंगुला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघच्या वतीने अध्यक्ष वि.भा. खानोलकर, सचिव राजन गावडे, खजिनदार श्रीनिवास सौदागर यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकातुन केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, वेंगुर्ला मत्स्य मार्केट नवीन बांधण्यापूर्वी त्यामधील जुने व्यापारी तेथे गेली ७०-८० वर्षे आपला व्यवसाय तेथे करत होते. मार्केटची इमारत बांधण्यापूर्वी सदर गाळेधारकांना पुनर्प्रस्थापित करण्याचे नगरपालिकेकडून वेळोवेळी सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने वापरण्यायोग्य नसलेले गाळे सुद्धा जुन्या गाळेधारकांनी नगरपालिकेचे भाडे भरून नवीन गाळे मिळतील. या आशेवर ताब्यात घेतले होते. त्यातील काही गाळेधारक विपरित परिस्थितीशी सामना करत तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या गाळ्यामध्ये आपला व्यवसाय करत आहेत. दरम्यान नवीन इमारतीतील गाळ्याचा ई-लिलाव लागल्यामुळे सदर जुने गाळेधारक पूर्णतः उध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण या लिलावात मोठी विनापरतावा घेण्यात येणारी रक्कम देण्याची त्यांची कुवत नाही. परंतु आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या चरितार्थासाठी सदर गाळे घेण्या व्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय त्यांचे समोर उपलब्ध नाही. त्यांना ज्या गाळ्यात आपण गेली इतकी वर्षे व्यवसाय करत होतो. ते गाळे आपल्याकडून काढून घेतले जातील, याची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. म्हणून आम्ही वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ व्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत, आमचे व्यावसायिक बंधू ज्यांनी इतकी वर्षे आपला व्यवसाय केवळ चरितार्थ चालवून सेवा देण्यातच धन्यता मानली व अवास्तव नफा न मिळविता व्यवसाय केला म्हणून आज अनामत रक्कम भरण्याकरिता पुरेसे आर्थिक पाठबळ त्यांचेकडे नाही, परंतु गाळ्याची मात्र त्यांना नितांत आवश्यकता आहे. हे सर्व पहाता या लिलावात भाग घेणान्या लोकांना जे पुढे आमचे व्यावसायिक बंधूच होणार आहेत. त्यांना आम्ही कळकळीची विनती करू इच्छितो की, त्यांनी सदर लिलावाची बोली लावताना वरील पार्श्वभूमीचा जरूर विचार करावा. आमच्या जुन्या गाळेधारकांना Right of Refuse या तत्त्वाचा वापर करूनही (प्रथम प्राधान्याने जुन्या पंधरा गाळेधारकांना दिले जातील.) गाळे न मिळाल्यास ते व त्यांचे कुटुंब पूर्णतः उध्वस्त होण्याची भीती आहे. याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी व सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
