वेंगुर्ला प्रतिनिधी- गणेश चतुर्थी अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच मूर्ती शाळांमध्ये लगबग वाढली आहे. नियोजित वेळेत गणेश सुबक व आकर्षक मूर्ती गणेशभक्तांना उपलब्ध करुन देण्यासाठी मूर्तीकार रात्ररात्र जागून काम करीत आहेत. सर्वांच्या चेह-यावर हसू आणणारा, मूर्तीकारांसहीत भजनी मंडळींना व्यासपिठ मिळवून देणारा, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा गणेश चतुर्थीचा सण १० सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या सणाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. घरांची साफसफाई, रंगरंगोटी आदी युद्धपातळीवर सुरु आहे. गणपती शाळांमध्ये तर कमालीची धांदल उडत आहे. गणपती रंगविण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. अगदी प्रौढांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी या रंगकामात झोकून घेतले आहे. गणेशभक्तांच्या आवडीनुसार मूर्तीकार मूर्ती रंगविताना दिसत आहेत. गणेशभक्तांचीही शाळेतील ये-जा वाढली आहे. आपला गणपती इतरांपेक्षा नाविन्यपूर्ण असावा यासाठी प्रत्येक गणेशभक्त विविध कलाकुसरींकडे लक्ष देत आहेत.
मूर्तीशाळांमध्ये लगबग वाढली
