बॅरिकेटच्या आतमधील भागाचे जेसीबीद्वारे सपाटीकरण
*⚡कणकवली ता.०४-:* महामार्ग चौपदरीकरणात कणकवलीत उड्डाणपुलाखाली यावर्षी बाजार भरण्याच्या दृष्टीने कणकवली नगरपंचायतच्यावतीने गणेशोत्सव कालावधीचे नियोजन करण्यात आल्यानंतर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली. यात प्रामुख्याने कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खालील बॅरिकेटच्या आतमधील भागाचे जेसीबीद्वारे सपाटीकरण करण्यात आले. तसेच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक भाजी, फळ, फुले विक्रेत्यांना दुकाने मांडण्यासाठी जागा आखून देण्यात आली. यामुळे या भाजी मार्केटला सुसूत्रता येणार असून, नगरपंचायतच्या या नियोजनामुळे या विक्रेत्यांच्या बैठक व्यवस्थेत एक सुसूत्रता येणार आहे. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पटवर्धन चौकासह फ्लाय ओव्हर ब्रिज खालील भागात भेट देत पाहणी करून सूचना दिल्या. यावेळी ठेकेदार अनिल पवार यांच्यासह नगर पंचायत कर्मचारी सचिन नेरकर व अन्य उपस्थित होते.
