कणकवलीत १ लाख ३८ हजाराची विज चोरी; पोलिसात गुन्हा दाखल
*⚡कणकवली ता.०४-:* मागील १२ महिन्यांपासून अनधिकृतपणे वीज चोरीच्या उद्देशाने मिटर बायपास करून ७ हजार ७७ युनिटची म्हणजेच १ लाख ३८ हजार ५७८ रुपये किंमतीची वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.कणकवली शहरातील कांबळे गल्ली रोडवरील आईस्क्रिम पार्लर दुकान असलेल्या ठिकाणी वीजचोरी होत असल्याची बाब शोध पथकाच्या उपकार्यकारी अभियंता यांना आढळून आली आहे. याप्रकरणी वीज वितरण कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार साई विजय कोदे व श्वेता संजय नार्वेकर यांच्या विरूद्ध कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार महावितरणच्या भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानोबा सदाशिव बंडगर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली.२७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास बंडगर आणि त्यांचे सहकारी विक्रम साव , गुरुदास सावंत यांनी कांबळी गल्ली रोडवर असलेल्या रत्नागर आईस्क्रिम पार्लर दुकानाच्या वीज मिटरची तपासणी केली असता संबंधित ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी वीज वापरदार साई विजय कोदे यांना वीज ग्राहक व घरमालकाचे नाव विचारले असता श्वेता संजय नार्वेकर असे सांगितले. संबंधित ग्राहकाचा वीज मिटर क्रमांक असून वीज मिटरला पोलवरून येणार्या इनकमिंग काळ्या रंगाच्या सर्व्हिस वायरला पिवळ्या रंगाच्या दोन सिंगल कोेर वायरचा जोड देवून मिटर बायपास करून वीज प्रवाह रत्नागर आईस्क्रिम पार्लर दुकानामध्ये आणलेला आढळला. अशाप्रकारे दुकानामध्ये असलेल्या बोर्डद्वारे संपूर्ण आईस्क्रिम पार्लरसाठी वीज वापरली जात होती. संबंधित वापरलेल्या वीजेची वीज मिटरमध्ये कोणत्याही प्रकारची नोंद होत नव्हते. त्यामुळे तिथे वीज चोरी सुरू असल्याचे आढळले. तसेच दुकानामध्ये ५ डिप फ्रिज, १ पंखा, ५ एलईडी, १ कॉम्प्युटर,१ प्रिंटर इत्यादी उपकरणे चालू असल्याची आढळली. संबंधित वीज चोरीच्या उद्देशाने जोडलेला विद्युतभार १४.५२ एएमपी एवढा आढळला. तपासणीवेळी असलेल्या प्रत्यक्ष परिस्थितीचा घटनास्थळी २ पंचाच्या साक्षीने पंचनामा करून पिवळ्या रंगाची २.५ स्क्वेअर मिटर सिंगल कोर वायरचा तुकडा जप्त करण्यात आला. अशाप्रकारे विद्युत कायद्यानुसार वीज चोरीचा गुन्हा ठरत असल्याने याबाबतची तक्रार कणकवली पोलिस स्थानकात दिली आहे
