वैभववाडी पोलीस ठाण्यातुन बदली झालेल्या चार कर्मचाऱ्यांना दिला निरोप

*⚡वैभववाडी ता.०३-:* वैभववाडी पोलीस ठाणे मधून बदली झालेल्या पोलीस हवालदार राजू जामसंडेकर यांच्यासहित चार कर्मचाऱ्यांचा निरोप संभारंभ पोलीस ठाण्यात पार पडला. पो.नि. अतुल जाधव यांनी या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देत सत्कार केला. गेली पाच, सहा वर्ष प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक अतुल जाधव, तहसीलदार रामदास झळके, भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, उद्योजक विकास काटे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, जि.प. सदस्य शारदा कांबळे, मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडे, माजी नगरसेवक संजय सावंत, बंड्या मांजरेकर, तालुका बौध्द सेवा संघाचे सरचिटणीस रवींद्र पवार, शरद कांबळे, राजेंद्र कांबळे व कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पो. हवालदार राजू जामसंडेकर यांची क्राईम ब्रँच ओरोस येथे बदली झाली आहे, पोलीस नाईक योगेश तळेकर यांची बॉम्बशोध नाशक पथक ओरोस येथे बदली झाली आहे. श्रीमती पद्मिनी मयेकर यांची कुडाळ पोलीस ठाणे, आशा चव्हाण यांची कणकवली पोलिस ठाणे, प्रसाद पाटील यांची बांदा पोलीस ठाणे या ठिकाणी बदली झाली आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव म्हणाले, पोलीस ठाण्याचा चार्ज हाती घेतला त्यावेळी मला कमी कालावधीत वैभववाडीची परफेक्ट ओळख करून देणारी व्यक्ती म्हणजे हवालदार श्री. जामसंडेकर. असा सहकारी मला मिळाल्याने काम करणे अधिक सोपे झाले. ठाण्यातील सर्व पोलीस सहकारी मित्रांना विश्वासात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. बदलीला संधी म्हणून प्रत्येकाने पाहिले पाहिजे. बदली झालेले कर्मचारी कायम ह्रदयात राहतील. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा असे सांगितले. सत्कारमुर्ती राजू जामसांडेकर म्हणाले, पो.नि. अतुल जाधव यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्यच आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून श्री जाधव साहेब आहेतच. शिवाय जबाबदार पालक म्हणूनही त्यांची भूमिका कायम महत्वाची राहीली आहे. वैभववाडी तालुक्याने आपल्याला भरभरून प्रेम दिले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी हा तालुका खूपच चांगला आहे असे सांगितले. प्रसाद पाटील, आशा चव्हाण व श्रीमती मयेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री संतोष टक्के यांनी मानले. फोटो – वैभववाडी पो. ठाण्यात कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना पो.नि. अतुल जाधव. छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page