बंदला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाचा पाठिंबा, सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे केले आवाहन*
💫सावंतवाडी दि.१६-:* शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करण्यासाठी राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शुक्रवार दिनांक १८ डिसेंबर रोजी एक दिवशीय शाळा बंद आंदोलन जाहीर केले असून, या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाने पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र शासनाने अनुदानित/ अंशतः अनुदानित, माध्यमिक, उच्चमाध्यमिक विद्यालयातील प्रचलित चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची ५२ हजार पदे संपुष्टात आणली आहेत. यापुढे शिपाई, नाईक, पहारेकरी, प्रयोगशाळा परिचर इत्यादी चतुर्थश्रेणी पदे शिपाई भत्ता देऊन कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून, शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम करणारा असल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने याचा निषेध करण्यासाठी एक दिवशीय शाळा बंद आंदोलन जाहीर केले असून, या आंदोलनाद्वारे शासनाने नवीन निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या बंदला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाचे अध्यक्ष जी. एम. सावंत व सह सचिव योगेश राऊळ यांनी संघटनेच्या वतीने पत्रक काढून सर्व अनुदानित/ अंशतः अनुदानित, माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळा चालवणाऱ्या संस्थांना तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या एकदिवशीय राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
