कुडाळच्या आठवडा बाजारात घडली घटना
*💫कुडाळ दि.१६-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवप्रेमी ग्रुप कुडाळ यांच्या कार्यकर्त्यांनी आज आठवडा बाजार दिवशी चरस गांजा आदी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कुडाळचे मनसेचे शहर सचिव रमा नाईक यांना मिळालेल्या माहितीनुसार कुडाळमध्ये पाटील व ताबीश नाईक हे व्यक्ती आठवडा बाजार दिवशी चरस गांजा विकत असल्याचे कळाले. त्यानंतर मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष हितेंद्र काळसेकर, शिवप्रेमी ग्रुपचे स्वरूप वाळके, लकी सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कुडाळ येथे संबंधितांना पकडले. मात्र यांचे मुख्य सूत्रधार हे अजूनही मोकाट आहेत. कुडाळ तालुक्यात चालू असलेल्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी मनसेने यापूर्वी १३ ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती त्यांची जागा आदींबाबत सविस्तर माहिती कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती. परंतु अपेक्षित कठोर कारवाई होत नसल्याने असे अवैध व्यवसाय वाढीस लागल्याने तरुण पिढी अक्षरशः व्यसनाधीन होऊन बरबाद होत असल्याचे चित्र आहे. मनसे याबाबत आक्रमक असून येत्या आठ दिवसात चरस गांजा आदी अंमली पदार्थ जिल्ह्यात घेऊन येणारे खरे सूत्रधार कुडाळ पोलिसांनी शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.
