गणेशचतुर्थी पूर्वी क्यार वादळातील नुकसानग्रस्त मच्छिमाराना भरपाई द्या

अ.भा.मच्छिमार गाबीत समाज महासंघ सरचिटणीस सुरेश बापार्डेकर यांनी केली मागणी

*⚡मालवण ता.२७-:* क्यार वादळात नुकसानग्रस्त झालेल्या वायरी, तारकर्ली, देवबाग यासह अन्य गावातही मच्छिमार, रापणकर, लहान मासळी विक्रेता मच्छिमार यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. या मच्छिमारांना मत्स्य पॅकेजचा लाभ अद्याप का मिळाला नाही. गणेश चतुर्थी पूर्वी क्यार वादळातील नुकसानग्रस्त मच्छिमाराना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मच्छिमार गाबीत समाज महासंघाचे सरचिटणीस सुरेश बापार्डेकर यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. क्यार वादळानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर तालुक्यातील ५७७७ मच्छिमार लाभार्थ्यांना ५ कोटी ४० लाख एवढी रक्कम मिळाली तर मालवण तालुक्यातील तारकर्ली, देवबाग, वायरी येथील रापण संघाचे अंदाजे २००० सभासद, ३५०० लहान मासळी विक्रेते मच्छिमार काही नौका धारक यांना ४६ लाख रक्कम अजूनही देणे आहे. या मच्छिमारांना अद्याप मत्स्य पॅकेजचा हा लाभ का दिला गेला नाही ? वादळे, मत्स्य दुष्काळ व कोरोना महामारीतील लॉकडाऊन यामुळे मच्छिमार आर्थिक अडचणीत सापडले असून नुकसान भरपाईची ही रक्कमही या मच्छिमारांना मिळालेली नाही त्यामुळे लवकरात लवकर मच्छिमारांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी सुरेश बापार्डेकर यांनी निवेदनात केली आहे.

You cannot copy content of this page