केणीवाड्यातील स्ट्रीट लाइट अखेर सुरू

सरपंचांनी दिलेला शब्द पाळला : भाजपचे काका परब यांनी व्यक्त केले समाधान

*⚡बांदा दि.२७-:* तौक्ते चक्रिवादळानंतर चार महिने पाडलोस-केणीवाडा येथील स्ट्रीट लाइट बंदावस्थेत होती. भाजपा पदाधिऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पाडलोस ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेत स्ट्रीट लाईट सुरू केली. सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने भाजप सावंतवाडी युवामोर्चा सरचिटणीस विनायक ऊर्फ काका यांनी समाधान व्यक्त केले. केणीवाडा स्ट्रीट लाईट संदर्भात ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी काका परब यांच्याकडे आल्या होत्या. भाजप पाडलोस बुथ उपाध्यक्ष हर्षद परब यांनीही यापूर्वी आवाज उठवला होता. त्यामुळे सोमवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडत ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. त्यावेळी सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी चार दिवसांत स्ट्रीट लाईट सुरू करणार असल्याचा शब्द दिला. ग्रामस्थांची विशेषतः भजनी मंडळांची होणारी अडचण लक्षात घेत अवघ्या तीन दिवसांत त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला. ग्रामसेवक प्रतिभा आळवे व सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी स्वतः पाहणी केल्यानंतर वीज विभागाला तशा सूचनाही केल्या. दोन दिवसांत वीज कर्मचाऱ्यांनी मेहनत घेत स्ट्रीट लाईट सुरू केली. ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याने गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे काका परब यांनी सांगितले. दरम्यान, स्ट्रीट लाईट सुरू झाल्याने केणीवाडा वासीयांसह गणेश भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page