गणेश घाटासमोर बांधला बंधारा

कुडाळ : पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत कविलकाटे येथील ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांनी रविवारी (११ ऑक्टोबर) श्रमदानातून जलसंधारणाचे काम केले. कविलकाटे येथील बाळकृष्ण नगरमधील गणेश घाटासमोर ग्रामस्थांनी एकत्र येऊन बंधारा बांधला. गावातील पाचही वाड्यांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या उपक्रमाला हातभार लावला.
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजलपातळी वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. दैनंदिन कामांतून वेळ काढत महिला आणि पुरुष ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान केले. या उपक्रमातून लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, जलसंधारणाबाबत जनजागृती होण्यासही मदत होणार आहे.
या वेळी पोलीस पाटील हेमंत मातोंडकर, नगरसेविका ज्योती जळवी, कुंदा जळवी, शैलेश जळवी, अरुण जळवी, समिल जळवी, रितेश जळवी, राजन जळवी, निलेश जळवी, मदन जळवी, प्रसाद जळवी, अरविंद जळवी, राजाराम गडेकर, संकेत आळवे, विलास जळवी, दीपक जळवी, अभय जळवी, पापा गडेकर, संजय जळवी, रामदास जळवी, आशिष जळवी, श्री. कदम यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमासाठी नगरसेवक अभिषेक गावडे यांनी जेसीबी उपलब्ध करून सहकार्य केले, तर बाळकृष्ण नगर येथील विलास जळवी यांनी बंधाऱ्यासाठी माती उपलब्ध करून दिली. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत केलेले हे श्रमदान कौतुकास्पद असून, अशा लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केल्यास गावाची पाण्याची गरज भागविण्यास आणि भविष्यातील टंचाईचा सामना करण्यास मदत होणार आहे.
