Headlines

तुळसुलीत रोटरी क्लबतर्फे दुसरा कच्चा बंधारा पूर्ण

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाचा उपक्रम

कुडाळ : संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या पुढाकाराने तुळसुली येथे कच्चा बंधारा क्रमांक २ यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. तुळसुली ग्रामपंचायत आणि लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली यांच्या सहकार्याने हा जलसंधारणाचा उपक्रम राबविण्यात आला.
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढविणे, या उद्देशाने कच्चे बंधारे उभारण्याचे महत्त्व वाढले आहे. तुळसुली येथे पूर्ण झालेल्या या बंधाऱ्यामुळे परिसरातील जलसंधारणाच्या प्रयत्नांना हातभार लागणार आहे. विशेषतः शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या बंधाऱ्याच्या उभारणीत विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि रोटरी क्लबच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून जलसंधारणासोबतच पर्यावरण संवर्धन आणि पाण्याच्या नियोजनाबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.
पाणी जपा, जीवन वाचवा आणि हरित कुडाळ घडवा’ हा संदेश देणारा हा उपक्रम सामूहिक प्रयत्नांतून जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

You cannot copy content of this page