Headlines

घरकाम करणाऱ्या महिलेने लंपास केले ५१५ ग्रॅम सोन्याचे दागिने…

वेंगुर्ले पोलिसांकडून चोरीचा उलगडा: पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती..

⚡ओरोस, ता. ११-: घराचे कुलूप तुटलेले नाही, जबरदस्तीने प्रवेश केल्याच्या खुणा नाहीत, चोरी नेमकी कधी झाली याचाही पत्ता नाही; मात्र कपाटातील तिजोरीत ठेवलेले तब्बल २० लाखांचे (जुन्या दराने, आताच्या दराने सुमारे ७० लाख) सोन्याचे दागिने गायब! या रहस्यमय चोरीने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. अखेर संशयाची सुई घरात काम करणाऱ्या महिलेवर फिरली आणि घरकाम करणाऱ्या २७ वर्षीय महिलेनेच तब्बल ५१५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे पोलिस तपासात उघड झाले. विशेष म्हणजे चोरीचे दागिने घराशेजारील पडक्या घरात लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चोरीचा उलगडा झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील बैठक सभागृहात ही पत्रकार परिषद रविवारी सायंकाळी घेण्यात आली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक नयोनी साटम, स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे, वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पोलिस अधीक्षक दहिकर यांनी, वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली-नोबारवाडी येथील सलोनी सुधीर लोभेकर (वय ७२) यांच्या घरात ही चोरी झाली होती. त्यांच्या कपाटातील तिजोरीत विविध प्रकारचे सोन्याचे दागिने ठेवले होते. त्यांचे एकूण वजन ५१५ ग्रॅम, तर किंमत सुमारे जुन्या दरानुसार २० लाख रुपये होती. काही काळानंतर तिजोरीतील दागिने गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी २३ सप्टेंबरला वेंगुर्ला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या चोरीचा तपास करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले होते. लोभेकर यांच्या घरात काम करणाऱ्या चार व्यक्तींसह अन्य संबंधितांची माहिती पोलिसांनी घेतली. चोरी नेमकी कोणत्या दिवशी झाली, दागिने कोणी आणि कधी काढले, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नव्हती. घरात जबरदस्तीने प्रवेश झाल्याचेही कोणतेही ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे संशयितांची तांत्रिक माहिती, हालचाली आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू ठेवला होता.
वेंगुर्ला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक योगेश कांबळे आणि त्यांच्या पथकाने संशयितांची कसून चौकशी सुरू केली. तपासादरम्यान घरकाम करणाऱ्या मार्टिना डुमिन लुईस (वय २७, रा. दाभोली-नोबारवाडी, ता. वेंगुर्ला) या महिलेच्या हालचालींबाबत संशय निर्माण झाला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली, असे दहिकर यांनी सांगितले.

दागिने लपविण्यासाठी पडक्या घराचा वापर
चोरीनंतर दागिन्यांची विल्हेवाट लावण्याऐवजी संशयित महिलेने ते आपल्या राहत्या घराशेजारी असलेल्या पडक्या घरात लपवून ठेवले होते. चौकशीत ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे शोध घेतला. या शोधात चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने सापडले. पोलिसांनी पंचांसमक्ष संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. अशाप्रकारे कोणताही ठोस धागादोरा नसलेल्या चोरीचा उलगडा करण्यात वेंगुर्ला पोलिसांना यश आले. दरम्यान, या प्रकरणातील चोरी नेमकी कधी झाली, याबाबत सुरुवाती पासूनच अनिश्चितता होती. घरातील व्यक्तींवरही संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे निरपराध व्यक्ती अडचणीत येणार नाही, याची काळजी घेत पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केल्याचे डॉ. दहिकर यांनी सांगितले.

चौकट
संशयाला मिळाली कबुलीची जोड!
चोरी झालेल्या घरात संबंधित महिला सुमारे आठ महिन्यांपासून घरकाम करीत होती. घरातील वस्तू आणि दागिने कुठे ठेवले जातात, याची तिला माहिती होती. चोरीतील एका दागिन्याच्या विक्रीसंदर्भात मिळालेला धागाही तपासात महत्त्वाचा ठरल्याचे पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संशयित महिलेच्या हालचालींची अधिक माहिती घेतली. सखोल चौकशीनंतर तिने चोरीची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे. अखेर घरालगतच्या पडक्या घरातून सर्व दागिने हस्तगत करण्यात आले.

चौकट
पोलिस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भावगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलिस उपनिरीक्षक योगेश कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. अवघड परिस्थितीतही तपासाची दिशा निश्चित करून संपूर्ण चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पथकाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: दागिने चोरी प्रकरण उघड करणाऱ्या वेंगुर्ले पोलिस पथकासह जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोनी साटम

You cannot copy content of this page