मळगावात परंपरागत ‘मांजरी’प्रथेला मध्यरात्रीपासून सुरुवात

दोन दिवस, तीन रात्रींचा देवांच्या विश्रांतीचा कालावधी

मानकऱ्यांसहीत सर्व ग्रामस्थ मांजरीची प्रथा जपून एकोप्याचे देतात दर्शन

*💫सावंतवाडी दि.१६ सहदेव राऊळ-:* मळगाव गावच्या “मांजरी” या आगळ्यावेगळ्या परंपरेस मंगळवार मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. मांजरी ही दोन दिवस आणि तिनं रात्रींची असते. गावातील देवांचा विश्रांती घेण्याचा हा कालावधी असतो. या कालावधीत गावात मंदिरातील देवाची तसेच घरच्या देवाचीही पूजा केली जात नाही. मांजरी उठेपर्यंत गावात कोणतेच धार्मिक कार्य केले जात नाही. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा गावातील मानकऱ्यांसहीत सर्व गाव एकोप्याने जपत आले आहे. मळगाव गावचे पंचायतन (देवाची तरंगकाठी, माऊली, रवळनाथ, भुतनाथ, पालखी त्यात पूर्वचारी देवाची उत्सव मुर्ती) हे सोनुर्ली जत्रेला गेल्यानंतर तिथे चार दिवस राहून पाहुणचार केला जातो. मग तेथे मळगाव गावचे राऊळ व गावकर मानकरी जाऊन कौल प्रसाद घेऊन पंचायतन मळगावला नेण्याचा कौल झाला की ते सर्व घेऊन मानकरी परतीच्या वाटेला लागतात. हे पंचायतन घेऊन मळगावमध्ये कुळाच्या घरी (राऊळ) ठेवले जाते. त्यानंतर पंचायतनचे सर्व देव कुळाच्या घरीच स्थायिक असतात. मांजरी बसायच्या अगोदर हे सर्व पंचायतन देवदिपावलीच्या दिवशी वाजत गाजत रात्री मळगावातील गर्द वनराईत असलेल्या माया पुर्वचारी मंदिरात जायला निघतात. निघायच्या अगोदर कुळाच्या घरून निघताना पंचारती केली जाते. त्यानंतर पंचायतन बाहेर काढून मंदिराकडे जायला निघतात. मंदिरात पोचायला जवळजवळ एक तासाचा कालावधी लागतो, मंदिरात गेल्यावर धुपारती करून पंचायतन मंदिराच्या सभामंडपात मंलगुन ठेवतात, पालखीतली उत्सव मुर्ती पुर्वचारी देवाच्या पाषाणाजवळ ठेवली जाते. मग मंदिरामध्ये थळ (गावकर) आणि कुळ (राऊळ) तसेच बाहेर दांडेकर यांच्यासाठी बांबुपासून बनवलेली मांजरी (डाळी) घालतात. त्यानंतर पाषाणाजवळ कटू पणाचा न सोललेला नारळ ठेवला जातो. त्यानंतर मांजरी बसल्याच कटुपणाचा नारळ ठेवल्याच गाऱ्हाण बोलल जात. गाऱ्हाण बोलून झाल्यावर खऱ्या अर्थाने मांजरीस सुरूवात होते. मंदिरात राहणारे मानकरी सोडले तर इतर कोणीही मंदिरात थांबत नाहीत. सर्व मंडळी आपआपल्या घरी जातात, मांजरी ही दोन दिवस आणि तिन रात्रीची असते. मंदिरात थांबलेले सर्व मानकरी त्या दिवसात मंदिर सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मांजरीच्या काळात मळगाव गावातील कुठल्याही मंदिरात, गावातील घरात देवाची पुजा केली जात नाही. या दिवसात देवाला दिवाही लावला जात नाही. तसेच देवाची घंटा वाजवली जात नाही. तसेच गावात इतर कुठलेही वाद्य वाजविले जात नाही. या काळात गावातील व्यक्ती कामानिमित्त गावाबाहेर जाऊ शकते, पण सायंकाळी पुन्हा गावात याव लागत. जर एखादी व्यक्ती या काळात गावाबाहेर राहिली तर मांजरी उठेपर्यंत तीन दिवस गावात येऊ शकत नाही. जर कोणाला गावाबाहेर जायच असल्यास आणि दोन दिवस रहायच असल्यास त्याने मांजरी बसायच्या आधी बाहेर गावी जायचं ते तिसऱ्या दिवशी मांजरी उठल्यावर यायच, अशी रित आणि देवाचं बंधन आहे, तिसऱ्या रात्रीच्या पहाटे मंदिराच्या पायरीवर देवाचा वाघ येऊन तीन डरकाळ्या फोडतो. तसेच आपल्या शेपटीने अंगण साफ करून निघुन जातो. त्यानंतर अवसार उभे राहून मांजरी उठल्याचा कौल दिल्यावर पहाटे मांजरी उठवली जाते. त्यानंतर मंदिर परिसरात झाडलोट केली जाते. मांजरी उठल्यावर गावातील सर्व धार्मिक कार्यांना पुन्हा एकदा सुरुवात होते.ज्या दिवशी मांजरी उठते त्याच दिवशी श्री देव मायापूर्वचारी देवाची जत्रा होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी श्री देव भूतनाथ देवाची जत्रा होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंगळवार मध्यरात्रीपासून मांजरीस सुरुवात झाली असून दोन दिवस आणि तिन रात्रींनानंतर शुक्रवारी मांजरी उठणार आहे. त्यानंतर मायापूर्वचारी जत्रोत्सव शुक्रवारी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. व त्यानंतर भूतनाथ जत्रोत्सव शनिवारी १९ डिसेंबर रोजी होणार आहे. अशीही मळगाव गावची आगळी वेगळी ‘मांजरी’ ची प्रथा गाव एकोप्याने जपत आल आहे.

You cannot copy content of this page