कणकवली : ठाणे येथून कणकवली असा मेंगलोर एक्सप्रेसने प्रवास करत असताना शंकर रामचंद्र तावडे ( सध्या रा. डोंबिवली, मुळ रा. कुंभवडे) यांच्या बॅग मधील पॉकेटमधून साडेपाच हजाराची रोख रक्कम चोरणारा संशयित चोरटा नितीश शेट्टी (वय ४९, मुळ कर्नाटक, सध्या रा. अंबरनाथ) याला शुक्रवारी सकाळी रेल्वे पोलीसांच्या मदतीने कणकवली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून रोख रक्कम तसेच एका आयफोनसह चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
फिर्यादी शंकर तावडे हे गुरूवारी रात्रौ ११ वाजता ठाणे येथे मित्रांसोबत मेंगलोर एक्सप्रेसने गावी येण्यासाठी निघाले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्यांच्या बॅगेतील पॉकीटातील रोख रक्कम चोरीस गेल्याचे नांदगाव रेल्वे स्टेशनच्या दरम्यान आल्यावर निदर्शनास आले. त्यावेळी संशयीत त्यांच्याच S1 या बोगी मध्ये होता. त्यानेच चोरी केल्याचा संशय आल्याने त्यांनी कणकवली स्थानकात गाडी आल्यानंतर रेल्वे पोलीसांना माहिती दिली. यावेळी त्या संशयिताला गाडीतच ताब्यात घेण्यात आले.
कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव व कर्मचारीही रेल्वे स्थानकावर दाखल झाले. संशयीत नितीश शेट्टी याच्याकडून साडेपाच हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली. तसेच त्याच्याकडे एका आयफोनसह चार मोबाईलही सापडले. तेही मोबाईल चोरीतीलच असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला. नितीश शेट्टी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे अधिक तपास करत आहेत.