पर्यटन व्यावसायिक अन्वय प्रभू यांचा इशारा..
⚡मालवण ता.११-:
मालवण किनारपट्टीलगत सीआरझेड चे उल्लंघन करून तसेच अतिक्रमण करून उभारलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ हटविण्यात यावीत अशा अशा सूचनेच्या नोटीसा मालवण किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिक व मच्छिमार यांना प्रांताधिकाऱ्यांकडून बजावण्यात आल्या आहेत. मात्र, किनारपट्टीवर उभारलेल्या शेड, टॉयलेट, चेंजीग रूम आदी सुविधा पर्यटन वाढीसाठी पर्यटन व्यवसायिकानी स्व:खर्चाने तात्पुरत्या स्वरूपावर उभारल्या असून पर्यटन वाढीत शासनाचे कोणतेही योगदान नाही, त्यामुळे ही बांधकामे हटविण्याबाबत शासनाने कोणतीही कार्यवाही केल्यास त्यास आमचा विरोध राहील तसेच आर या पार ची लढाई होईल असा, आक्रमक इशारा मालवण दांडी येथील पर्यटन व्यावसायिक अन्वय प्रभू यांनी दिला आहे.
किनारपट्टीवरील बांधकामे हटविण्याबाबत शासनाने बजावलेल्या नोटीसांबाबत बोलताना अन्वय प्रभू म्हणाले, मालवण दांडी किनाऱ्यावर दरवर्षी सुमारे ६ लाख पर्यटक भेट देतात. अनेक पर्यटक येथे वॉटरस्पोर्ट्स करतात. याच पर्यटकांना सुविधा देण्यासाठी स्थानिक पर्यटन व्यवसायिकानी किनाऱ्यावर शेड, बुकिंग सेंटर, टॉयलेट, चेंजिंग रूम आदी सुविधा निर्माण केल्या आहेत. यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची बांधकामे करण्यात आली आहेत. कोणतेही पक्के बांधकाम नाही. या सुविधा पर्यटन व्यवसायिकानी स्वतःच्या खर्चाने उभारल्या आहेत. ऑक्टोबर ते मे महिन्या पर्यंतच त्यांचा वापर होतो. यातील कोणत्याही सुविधा शासनाने दिलेल्या नाही आणि शासन देऊही शकत नाही. आम्ही निर्माण केलेल्या सुविधांमुळेच येथे पर्यटन वाढले आहे. स्थानिकांना रोजगार मिळत आहे. किनाऱ्यावर मच्छिमारांची जी कावने आहेत ती वर्षानुवर्षे आहेत, त्याठिकाणी मच्छिमार पकडलेले मासे ठेवतात, इतर मासेमारी साहित्य ठेवतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांची व मच्छिमारांची ही बांधकामे हटविण्यास आमचा विरोध आहे. शासनाने त्याबाबत कोणतीही कार्यवाही केल्यास आर या पार लढाई होईल, असा इशारा अन्वय प्रभू यांनी दिला आहे.
किनारपट्टीवर सीआरझेड नियम तोडून अनेक पक्की बांधकामे उभारली गेली आहेत. मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांची तात्पुरती उभारलेली बांधकामे तोडून आमच्या पोटावर पाय आणण्यापेक्षा किनारपट्टीवर सीआरझेड नियम तोडून धनदांडग्यानी उभारलेली इतर पक्की बांधकामे शासनाने तोडून दाखवावीत, असे आव्हानही अन्वय प्रभू यांनी शासनाला दिले आहे.