मिलिंद माने यांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर:सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण..
ओरोस ता ११
सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी देवगड येथील संशयित आरोपी प्रणाली माने आणि आर्य माने या दोघांना मंजूर करण्यात आलेल्या अंतरिम अटकपूर्व जामीनाची १५ जुलै पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. तसेच मिलिंद माने यांनाही १५ जुलै पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने मंजूर केला आहे.
सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण या विवाहित महिलेने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्ये प्रकरणी प्रिया चव्हाण यांच्या आई वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रिया चव्हाण हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली माने आणि आर्य माने या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी प्रणाली माने आणि आर्य माने यांनी येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. ८ जुलै रोजी या दोघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करीत या अर्जावर ११ जुलै रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय जाहीर केला होता.
त्यानुसार शुक्रवारी पुन्हा न्यायालयाने या दोन्ही संशयितांना मंजूर केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामिनाची मुदत १५ जुलै पर्यंत वाढविली आहे. दरम्यान, याच प्रकरणी देवगड येथील मिलिंद माने यांच्या विरोधात सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनीही अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार जिल्हा न्यायालयाने मिलिंद माने यांनाही दिलासा देताना १५ जुलै पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.