कणकवलीत जनरेटरच्या जाड तांब्याच्या वायरची चोरी…

सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला प्रकार..

⚡कणकवली ता.१०-: कणकवली शहरात जनरेटरसाठी वापरण्यात येणाऱ्या जाड तांब्याच्या वायर चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने या चोरीचा छडा लागल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली असून, वाढत्या चोरीच्या घटनांवरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कणकवली येथील सह्याद्री हॉटेलसमोर ब्रिजखाली लावण्यात आलेल्या जनरेटरची २५ स्क्वेअर एमएम जाडीची व सुमारे १०० मीटर लांबीची नवीन तांब्याची वायर सुमारे चार दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. ही वायर वेदा जनरेटरची असून, चोरीनंतर या घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

वेदा जनरेटरचे विनू महाडिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, चोराला पकडून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल, अशी जाहीर घोषणा केली होती. यानंतर सोमवारी शहरातील एका दुकानदाराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा संशयास्पद प्रकार कैद झाल्याने तपासाला दिशा मिळाली.

या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शहरातील भंगार व पुठ्ठा व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. तपासादरम्यान उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीकडे चोरीची तांब्याची वायर आढळून आली. जनरेटरमधील तांब्याची तार वेगळी काढून ती विक्रीसाठी घरात लपवून ठेवण्यात आली होती.

सुरुवातीला संबंधित व्यक्तीने चोरीची कबुली देण्यास नकार दिला. मात्र जमावाकडून ‘प्रसाद’ मिळाल्यानंतर अखेर त्याने चोरीची कबुली दिली आणि त्याच्याकडील तांब्याची तार ताब्यात देण्यात आली. त्यानंतर पुन्हा ‘यथेच्छ प्रसाद’ देत त्या व्यक्तीला सोडून देण्यात आले.

या घटनेमुळे कणकवली शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीचे प्रकार उघडकीस येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मात्र दुसरीकडे शहरात वाढणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा बसेल का, तसेच पोलिसांच्या गस्तीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, या विषयावर नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

You cannot copy content of this page