Headlines

मळगाव येथील ह. भ. प. नारायण गोसावी बुवा यांना माऊली पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.१०-: सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने आणि निष्ठेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राजापूर–लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई यांच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-गोसावीवाडी येथील ह. भ. प. नारायण गोसावी बुवा यांना माऊली पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले.
राजापूर–लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई यांच्यावतीने आयोजित ११ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन लांजा येथील नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे साहित्य नगरी येथे पार पडले. या संमेलनात ह. भ. प. नारायण गोसावी बुवा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोसावी बुवा यांनी संत शिरोमणी गोपाळबोध बुवा मळगावकर यांच्या पावन भूमीत वारकरी संप्रदाय स्वीकारून आपल्या जीवनात आध्यात्मिक बैठक दृढ केली. वारकरी संप्रदायाचा प्रसार करताना त्यांनी अनेक ठिकाणी कीर्तन सोहळ्यांचे आयोजन केले असून, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन आणि आध्यात्मिक विचारांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे केले आहे. “नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी” या उक्तीप्रमाणे गोसावी बुवा यांनी घराघरांत शांती, समाधान आणि सदविचार पोहोचविण्याचे पवित्र कार्य निस्वार्थ भावनेने केले आहे. त्यांच्या जनजागृतीपर कार्यामुळे तरुण पिढीला सदमार्गावर नेण्यास तसेच धार्मिक आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्यास मोठे योगदान लाभले असल्याचे गौरवपत्रात नमूद करण्यात आले. त्यांनी केलेल्या सामाजिक व आध्यात्मिक जनजागृतीच्या कार्याची दखल घेत त्यांना माऊली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे गोसावी बुवा यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून मळगाव पंचक्रोशीसह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page