नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते झाला कार्यक्रम
*⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडीतील हिरा लाखे आणि धनवंती चेंडके यांना दुसऱ्या पत पुरवठा लाभाचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते कर्ज मंजुरीचे पत्र आज देण्यात आले आहे. यावेळी इतर पथ विक्रेत्यांनीही आपल्या कर्जाची वेळेत परतफेड करून दुसऱ्या पत पुरवठ्याचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे. कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाऊन केल्याने पथ विक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरीत परिणाम झाला असून, सद्य स्थितीत त्यांच्याकडे भांडवल देखील उपलब्ध नाही आहे. त्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज होती. त्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे. या योजनेत पथ विक्रेत्यांना सावंतवाडी नगर परिषदेमार्फत बँकेच्या माध्यमातून प्रथम १० हजार रुपये इतक्या खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा करण्यात आलेला होता. त्याची परतफेड केलेल्या पथ विक्रेत्यांना २० हजार इतक्या दुसऱ्या पत पुरवठ्याचा लाभ मिळणार आहे. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, अभियान व्यवस्थापक एकनाथ पाटील, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
