मच्छीमारांच्या न्याय हक्कांसाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्यावतीने जन आक्रोश मोर्चा

मच्छीमारांनी सहभागी होण्याचे समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांचे आवाहन

*⚡मालवण ता.२३-:* मुंबईतील मच्छीमार समाजाचा व्यवसाय उध्वस्त करण्याचे कट- कारस्थान मुंबई महानगरपालिका आखीत असल्याचा आरोप करत मुंबई महानगरपालिकेच्या जाचक धोरणाविरोधात आणि मच्छीमारांच्या न्याय हक्कांसाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे २५ ऑगस्ट रोजी मच्छीमार जन आक्रोश मोर्चा आयोजित केला असून या मोर्चात मोठ्या संख्येने मच्छीमारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी केले आहे. दरम्यान, या आक्रोश मोर्चाला अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती सिंधुदुर्ग तसेच सर्व सिंधुदुर्गातील मच्छीमारांचा पाठिंबा आहे, असे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी सांगितले आहे. मुंबईत महानगरपालिकेने मच्छीमार्केट तोडल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने मच्छीमाराना आंदोलनाची हाक दिली आहे. मच्छिमार जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा मुंबई बंद करण्याची ताकद बाळगतो परंतु प्रत्यक्षात आपण कधीच रस्त्यावर उतरून मुंबई बंद करून दाखवली नाही. जो पर्यंत मच्छीमार आपली खरी ताकद रस्त्यावर उतरून दाखवत नाहीत, तो पर्यंत मच्छीमारांवर अघोरी अत्याचार होत राहणार आहेत. क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई असो वा दादर येथील सौ. मीनाताई ठाकरे मासळी मंडई असो, मच्छिमारांना आपल्याच मुंबईतून हदपार करण्याचा डाव सरकारी यंत्रणेत असलेल्या “उपरे” अधिकान्यांमार्फत होऊ लागला आहे आणि आज जर हा डाव हाणून नाही पाडला तर उद्या मुंबईत मच्छिमारांना “उपरे” म्हणुन फिरावे लागण्याची वेळ येऊन राहील. आपली संस्कृती, आपला व्यवसाय, आपली ओळख आणि मच्छिमार असण्याचा अभिमान जर टिकवायची असेल तर मच्छीमारांनी आता रस्त्यावर उतरले पाहिजे. वादळाला सातत्याने सामोरे जाणारा मच्छीमार मुंबईत वादळाचे रूप घेणार असून सरकारी यंत्रणांना मुंबईच्या खऱ्या राजाची ओळख घालून देण्याकरिता मच्छीमारांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी म्हटले आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई येथील मासळी व्यावसायिकांना न्याय देण्यात यावा, दादर येथील सौ. मीनाताई ठाकरे मासळी मंडईतील मासळी व्यावसायिकांना न्याय देण्यात यावा, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मच्छिमारांना त्वरित देण्यात यावी, कोळीवाडयांना गावठणाचा दर्जा देण्यात यावा, ओ.एन.जी.सी. च्या सर्व्हे मुळे झालेल्या मच्छिमारांच्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी, २४० कोटींचा थकीत डिझेल परतावा मच्छिमारांना त्वरित देण्यात यावा अशा मागण्या मच्छीमार कृती समितीकडून या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page