बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा वैधानिक संघटनेच्या रूपाने मिळाला बहुमान
*⚡सिंधुदुर्ग दि.२१-:* सिंधुदुर्गचे नामांकित वकील अॅड. संग्राम देसाई यांची महाराष्ट्र अॅण्ड गोवा बार कौन्सिलच्या।उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलच्यावतीने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा धावता आढावा.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा या वैधानिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी सिंधुदुर्गचे सुपुत्र अॅड. संग्राम देसाई यांची हाय मेरिट अँड मॅन ऑफ एक्सिलन्स अन्वये निवड होणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळालेले सुवर्णपदक आहे. ३ फेब्रुवारी २०१८ चा तो संस्मरणीय दिवस आजही आठवतोय. सिंधुदुर्गचे नामांकित वकील अॅड. संग्राम देसाई यांच्या महाराष्ट्र अॅण्ड गोवा बार कौन्सिलच्या निवडणूक प्रचार फेरीची सुरुवात वीरश्री संचारलेल्या योद्ध्यासारखे झाली. जिल्ह्यातील सर्व वकिलांनी आपली वाहने या प्रचाराच्या रणसंग्रामात दाखल केली. हा नजरेत भरणारा विशाल ताफा हा रत्नागिरीपासून प्रचारास निघाला होता. अॅड संग्राम आपल्या अमोघ वाणीने प्रत्येक वकील चेंबरमधील प्रभागामध्ये वकील सदस्यांची मने जिंकत होते. हा हा म्हणता रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर,.पुणे, मुंबई रायगड, ठाणे असे जिल्हे व तालुके सहकारऱ्यांसमवेत उत्कृष्ट व नियोजनबद्धपणे पादाक्रांत केले. सगळ्या ठिकाणी संग्रामंनी मुसंडी मारली होतीच, एकूण रिंगणात १७९ उमेदवार आणि लाखाच्यावर मतदार होते. अखेर तो सुदिन उगवला आणि संग्राम यांनी विजयश्री मिळवली. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या इतिहासात प्रथमत:च सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रतिनिधीचा बार कौन्सिलमध्ये दिमाखदार प्रवेश झाला, ही बाब सिंधुदुर्गवासीयांकरिता निश्चितच आनंदाची आहे. १४ ऑगस्ट१८६२ या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. या स्थापनेच्या दिवशीच आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कोकणचे सुपुत्र ठाणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. गजानन चव्हाण यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा चे अध्यक्षपदी व अॅड. संग्राम देसाई यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती होणे हा संपूर्ण कोकणवासियांसकरिता अविस्मरणीय क्षण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित आणि तैलबुद्धीचे सुपरिचित विधिज्ञ डी. डी. देसाई यांचा वारसा तितक्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अॅड. संग्राम देसाई करीत आहेत, असे म्हटले तर बिलकूल वावगे ठरणार नाही. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या सन २०१८ च्या निवडणुकीत जिल्ह्याची मतदारसंख्या अत्यल्प असतानाही सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनच्या खंबीर पाठींब्यामुळे मोठे धारिष्ट्य बाळगून दमदारपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरून सिंधुदुर्गची प्रतिष्ठा उंचावत अॅड. संग्राम देसाई विक्रमी मताधिक्याने निवडून आले. निवडणूक ‘संग्रामा’ तील नवख्या ‘संग्राम’ चे नाव सर्वच उमेदवारांमध्ये कमी वयाचा तरुण प्रतिनिधी म्हणून अखंड महाराष्ट्र आणि गोवा वकील संघटनेच्या वर्तुळात चर्चेस आले. आईचे वडील स्वातंत्र्यसेनानी, आईचे ‘व्याध, नावाचे नावाजलेले साप्ताहिक व ती बॅडमिंटन खेळाडू, वडील नावाजलेले कायदेतज्ज्ञ, भाऊ रणजित राजकारणातील अग्रणी, पत्नी सौ गौरी यादेखील वकील, मुलगी वकिली क्षेत्रात पदार्पण करणार आहे. एकंदरीत साहित्य, क्रीडा, समाजकारण, राजकारण अशा कौटुंबिक पार्श्वभूमीवर संग्राम यांचे नेतृत्व कौशल्य विकसित झाले आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा ही वकिलांची कायद्याद्वारे स्थापित झालेली स्वायत्त कौन्सिल असून वकील सदस्यांची नोंदणी, प्रशिक्षण, वेल्फेअर इन्शुरन्स योजना, सदस्यांना कर्ज, वर्तनावर नियंत्रण आदी वकिलांच्या सांगोपांग हक्कांकडे समस्यांकडे लक्ष देऊन काम करणारी संघटना आहे. आजमितीस या कौन्सिलकडे एक लाखाच्यावर वकिलांची नोंदणी असून या कौन्सिलवर दोन्ही राज्यांतील वकिलांचे प्रतिनिधी म्हणून इच्छुक व्यक्ती ही कुशलतेने नेतृत्व करणारी, वकिलांच्या अडीअडचणी समस्यांचे निराकरण करणारी, अगदी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ते प्रसंगी बार कौन्सिल ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांच्याशी संवाद साधणारी इतपत ताकदीची व तोडीची असेल तर या पदासाठी पात्र ठरते. या प्रतिष्ठेच्या आणि महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राज्यांतील रथी महारथी नेहमीच स्पर्धेत असतात, त्यात सिंधुदुर्ग म्हणजे कमी मतदारसंख्या असलेला भाग त्यामुळे विजयी होण्याकरिता आवश्यक मतदानाची जुळणी होणे कठीण असताना निवडणूक रिंगणात उतरणे हे धाडसाचेच होते. मात्र अॅड संग्राम हे केवळ निवडूनच आले नाहीत तर कौन्सिलची उपाध्यक्ष देखील झाले. वकिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी जे जे करणे शक्य आहे ते ते सर्व काम अॅड. संग्राम यांनी सुरू केले. वकिलांकरिता महाराष्ट्र आणि गोवा येथील ज्येष्ठ विधिज्ञांची व्याख्याने, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना विनंती करून त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा निमंत्रित करून त्यांची व्याख्याने आयोजित केली. वेल्फेअर योजना, विमा योजना, कर्ज योजना यावर लक्ष देऊन पाठपुरावा केला आहे. अलीकडील कोरोना महामारी काळात आणि पूरस्थितीच्या काळात गरजू विधिज्ञांना मदत मिळवून दिली. बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीवर एकमुखाने संग्रामचे निवड झाली, त्यामुळे संग्राम यांचे कार्य कर्तृत्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे. अॅड. संग्राम यांच्या स्वभावाचे अनेक पैलू उघड करता येणारे आहेत. त्यांच्यामध्ये संयमीपणा, भविष्यकाळाचे व्हिजन समोरच्याचे गुण हेरणे, मधाळ वाणी, इंग्रजी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व, उत्तम व्याख्याता असे अनेक गुण आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्हा, मुंबई व गोवा उच्च न्यायालयात एक नावाजलेला वकील म्हणून त्यांची ख्याती आहे.।आपल्यासमवेत असणाऱ्या वकिलांची काळजी घेणे, गरजूंना आर्थिक पाठबळ देणे हा त्यांचा सेवाभावी स्वभाव आहे. त्यांचे सोबती आणि सहकारी त्यांच्यावर प्रचंड माया करतात आणि हा ठेवा ते सतत जपत आहेत. तसेच ज्युनिअर वकीलांप्रती संग्राम यांचा स्नेहभाव उत्कट आहे. काहींचा स्वभाव वागणे राहणीमान हे इतरांनी मॉडेल म्हणून स्वीकारावे असे असते. संग्राम यांना हे तंतोतंत लागू पडते. कुशाग्र बुद्धिमत्ता, अभ्यासूवृत्ती आणि पटवून देण्याची हातोटी व कसब या सर्व गुणातून संग्रामची जडणघडण झाली आहे. संग्राम यांची कार्यपद्धती, कार्यक्षमता, कुशलता, संघटनात्मक कौशल्य, सलोखा, स्नेहाभावना, दांडगा संपर्क, लोकप्रियता यातून सहकाऱ्यांच्या बळावर संग्राम उपाध्यक्षपदाचे हकदार ठरले. ज्येष्ठ विधिज्ञ यांबाबत त्यांची आदरभावना कमालीची आहे. आपल्या माणसांनी घेतलेली दखल आणि केलेला सन्मान हा संग्राम यांच्यासाठी प्रेरणादायी ठरो, त्यामुळे संग्रामची जबाबदारी यापूर्वी पेक्षा निश्चितच आणखी वाढलेली आहे. न्यायमूर्तींकडून देखील त्यांनी चालविल्या खटल्यांमध्ये उत्तमपणे खटला आता अशी ठळक नोंद घेतली गेली आहेत. त्यामुळे त्यांचा सिंधुदुर्गवासीयांना नक्कीच सार्थ अभिमान वाटतो. संग्राम हे उपाध्यक्ष पदानंतर अध्यक्षपदाचे हकदार व्हावेत. अशा ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलकडून त्यांना सदिच्छा व भावी वाटचालीस शुभेच्छा
