राज्य कृषी विभागावर कृषी समितीत तीव्र नाराजी

सिंधुदुर्गनगरी ता २० राज्य अधीक्षक कृषी कार्यालयाकडून सभागृहात केलेल्या सूचनांचे पालन होत नाही. चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली जात आहे. सदस्यांच्या प्रश्नाना जाणीवपूर्वक टाळले जात आहे. याबाबत तीव्र भावना व्यक्त करत आजच्या कृषी समिती सभेत अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ ठराव नोंदविण्यात आला. तर भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याच्या तीव्र भावना सभेत सदस्यानी व्यक्त केल्या. जिल्हा परिषद कृषी समितीची सभा, समिती सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, सदस्य रणजीत देसाई ,सुधीर नकाशे ,गणेश राणे, सावी लोके, आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. आजच्या कृषी समिती सभेत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानी बाबत माहिती घेण्यात आली. यावेळी अधीक्षक कृषी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रत्यक्ष झालेली नुकसानी आणि झालेल्या पंच नाम्यानुसार नोंद करण्यात आलेली नुकसानी यामध्ये तफावत दिसून आली. प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पंचनाम्यानुसार किरकोळ नुकसानी दाखवण्यात आली आहे.यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार आहे .याबाबत सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त करून जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले पंचनामे वस्तुस्थितीदर्शक नाहीत. कार्यालयात बसून शेती नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत असे दिसून येत आहे. जिल्ह्यात भातशेतीचे अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पुरामुळे भातशेतीमध्ये दगड गोटे,गाळ आल्याने कित्तेक हेक्टर क्षेत्र कायमस्वरूपी नापिक बनले आहे. असे असताना प्रशासनाकडून वस्तुस्थितीदर्शक पंचनामे न करता चुकीचा अहवाल शासनास सादर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच प्रशासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. अशा तीव्र भावना आजच्या सभेत सदस्यांनी व्यक्त केल्या. सभेत मांडलेल्या सूचना आणि मागितलेल्या माहितीकड़े राज्य अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे. दिलेली माहिती चुकीची देऊन सभागृहाची दिशाभूल केली जात आहे. असा आरोप करत अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यपद्धती विरोधात आजच्या सभेत निषेधाचा ठराव नोंदविण्यात आला. जिल्हा परिषद कृषी विभागाला डावलले राज्य अधिक्षक कृषी कार्यालयाकडून आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवा पासून जिल्हा परिषद कृषी विभागाला डावलण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची पूर्वपरवानगी न घेता निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव छापून त्यांना आयत्यावेळी निमंत्रित करण्यात आले हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप सदस्य रणजित देसाई यांनी सभेत केला. जिल्हा परिषदेमार्फत रानभाज्यांचे प्रदर्शन जिल्हा परिषदेमार्फत यापूर्वी पशुपक्षी प्रदर्शन असो किव्हा अन्य विविध प्रदर्शने यशस्वीरीत्या भरविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमार्फत गणेश चतुर्थीपूर्वी रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय आजच्या कृषी समिती सभेत घेण्यात आला तर याबाबत चे नियोजन करण्याचे आदेश यावेळी कृषि सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी जि प कृषि विभागाला दिले.

You cannot copy content of this page