पुंडलिक दळवी : ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत सुरू करा
*⚡बांदा दि.१९-:* बांदा दशक्रोशीतील ४० हुन अधिक गावे ही बांदा बाजारपेठरवर अवलंबून आहेत. सण, उत्सव सुरू झाल्याने तसेच गणेश चतुर्थी सण तोंडावर आल्याने ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत सुरू करावी तसेच बसस्थानकावर अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी सफाई कामगार द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे. दळवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बांदा स्थानक प्रमुख प्रकाश नार्वेकर यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी दळवी यांनी सावंतवाडी आगार प्रमुख वैभव पडोळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पडोळे यांनी कायमस्वरूपी कामगार देण्याचे आश्वासन दिले. श्री नार्वेकर यांनी ग्रामीण भागात एसटी सुरू करण्यासंदर्भात सावंतवाडी आगार प्रमुखांना प्रस्ताव दिल्याचे तसेच सफाई कामगार मिळण्यासाठी पत्र दिल्याचे सांगितले. दळवी यांनी ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ नियोजन करून एसटी सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. यावेळी दळवी यांनी बसस्थानक परिसराची पाहणी केली तसेच प्रवाश्यांकडून येथील समस्या जाणून घेतल्या. याठिकाणी झाडी वाढली असून स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याच्या विहिरीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळू नका, तात्काळ या समस्यांचे निराकरण करा आशा सूचना दळवी यांनी यावेळी दिल्या. सफाई कामगार याठिकाणी नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. साथीचे रोग फैलावू नयेत यासाठी आपल्या प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे आहे. पडोळे यांनी दररोज दोन तास सफाई कामगार याठिकाणी कार्यरत राहील तसेच खासगी तत्वावर कायमस्वरूपी सफाई कामगार देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सावंतवाडी युवक विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष संजय भाईप, अस्लम खतीब, राष्ट्रवादी महिला जिल्हा व्यापार उद्योग अध्यक्षा दर्शना बाबर-देसाई, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, शहर अध्यक्ष देवेंद्र टेम्बकर, अझर खतीब, सोहेल शेख आदी उपस्थित होते.
