स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला उभादांडा शाळेत घेण्यात आली स्पर्धा
*⚡वेंगुर्ला ता.१७-:* भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला उभादांडा नवाबाग येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत ऑनलाईन स्वरुपात वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत लावण्या गोकरणकर-(भारतमाता), चार्वी कोळंबकर-(झाशीची राणी), प्रज्ञा आरावंदेकर (सावित्रीबाई फुले), रोशन केळुसकर, गाथा कोळंबकर, रोशनी मोटे आदी विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक सरस वेशभूषा सादर करुन स्पर्धेत रंगत आणली. या मुलांना मुख्याध्यापिका तन्वी रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक रामा पोळजी यांनी स्पर्धेचे नियोजन तर प्राजक्ता आपटे व मारुती गुडूळकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापनसमिती अध्यक्ष दादा केळुसकर, जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल व अन्य पालक ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
