केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून बंधाऱ्यासाठी दहा कोटी निधी देणार

फुटाणे वाटणाऱ्या आमदारांकडून तुम्ही फुटाणेही घ्या;निलेश राणे यांचे तळाशीलवासियाना आवाहन

*⚡मालवण ता.१६-:* सागरी अतिक्रमण ग्रस्त तळाशील गावच्या किनारपट्टीवर कायमस्वरूपी बंधारा व्हावा या मागणीसाठी काल स्वातंत्र्यदिनापासून तळाशील ग्रामस्थानी छेडलेल्या उपोषण आंदोलनात आम. वैभव नाईक यांनी तात्पुरत्या स्वरूपात दोन बंधारे बांधण्याच्या आश्वासनाने ग्रामस्थांचे पुरेसे समाधान झालेले नसताना आज भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी या उपोषण स्थळी उपस्थित राहत आंदोलनाला पाठिंबा दिला दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून येत्या दहा दिवसांत तळाशीलच्या बांधाऱ्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही निलेश राणे यांनी दिल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले. यावेळी निलेश राणे यांनी आम. वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका करताना आम. नाईक हे सगळीकडे फक्त फुटाणेच वाटण्याचे काम करत आहेत, तळाशील ग्रामस्थाना बंधाऱ्यापोटी आम. नाईक यांनी आपल्या कुवतीप्रमाणे केवळ ५४ लाखांचे फुटाणे आणले असून तेही ग्रामस्थांनी पदरात घ्यावेत, व आमदारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी टीका करताना आम्ही मात्र १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवणारच आहोत असे निलेश राणे म्हणाले. दरम्यान, तळाशील ग्रामस्थानी आपले उपोषण सुरूच ठेवले असून निलेश राणे यांच्या १० कोटी निधी देण्याच्या आश्वासनाने आमचे समाधान झाले आहे. मात्र आमदारांनी सांगितलेले तात्पुरत्या बंधाऱ्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत तसेच खाडी पात्रातील वाळू उपसा बंद व्हावा या आमच्या दुसऱ्या मागणीसाठी जिल्हाधिकारी उपोषण स्थळी भेट देऊन ठोस कार्यवाही करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, बंधारा होणे आमच्यासाठी गरजेचे असून तो कोणाच्याही माध्यमातून होवो. आमदार वैभव नाईक अथवा निलेश राणे यांनी काम सुरू न केल्यास पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असे ग्रामस्थानी स्पष्ट केले. सागरी अतिक्रमणग्रस्त तळाशील गावच्या किनाऱ्यावर संरक्षित बंधाऱ्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने निकराच्या लढाई साठी तळाशिलवासियांनी स्वातंत्र्य दिनी समुद्र किनारी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या बंधाऱ्याच्या आश्वासनानंतरही जोपर्यंत बंधाऱ्याचे प्रत्यक्ष काम चालू होतं नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा ग्रामस्थांनी पावित्रा घेत दुसऱ्याही दीवशी उपोषण चालू ठेवले होते. गावातील स्त्री पुरुष या उपोषणाला मोठ्या संख्येने दाखल झाले होते आज या आंदोलनाला भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी भेट देत ग्रामस्थांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला. यावेळी अशोक सावंत, सभापती अजिंक्य पाताडे, भाजपचे मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, हडी सरपंच महेश मांजरेकर, बाबा परब, विजय केनवडेकर आदी व इतर उपस्थित होते. जिल्हाधिकारी येईपर्यंत ग्रामस्थ उपोषणावर ठाम १५ ऑगस्टला ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. ग्रामस्थ ठोस आश्वासन मिळावे या मागणीसाठी ठाम आहेत. त्यातच आज आमदारांच्या वतीने आश्वासने देण्यात आली. त्यानंतर निलेश राणे यांनी १० कोटींचा निधी १० दिवसात देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ग्रामस्थांनी आपली एक मागणी पूर्णत्वास जात आहे मात्र दुसऱ्या बाजूला खाडीत होणारा वाळू उपसा बंद करण्याचे आश्वासन जोपर्यंत जिल्हाधिकारी देत नाहीत तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सोशल मीडियावर ते वृत्त पसरविणाऱ्याचा निषेध दरम्यान, तळाशील ग्रामस्थ आपले उपोषण सोमवारी सायंकाळी मागे घेणार अशा आशयाचे वृत्त सोशल मीडियावर पसरविण्यात आल्याबाबत यावेळी तळाशील ग्रामस्थानी तीव्र नाराजी व्यक्त करत असे वृत्त परसविणाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला.

You cannot copy content of this page