महाविकास आघाडी सरकारच्या धास्तीने भाजपला करावी लागत आहेत आंदोलने- हरी खोबरेकर

*💫मालवण दि.१४-:* राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सरकार कोरोना महामारी विरोधात यशस्वीपणे लढा देत असून आरोग्य विभागावर खर्च करताना विकास कामेही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र इंधन दरवाढ, बेरोजगारी, शेतकरी विरोधी कायदा, महागाई, मच्छीमारांच्या समस्या आदी प्रश्न सोडविण्यास भाजप प्राणित केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या अपयशी कामगिरीवर पडदा घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार स्थिरावतेय या भीतीने स्थानिक भाजप पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना राज्यातील महाविकासआघाडी सरकार विरोधात आंदोलने करावी लागत आहेत, अशी टीका करत भाजपवाल्यानी नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा कामे करावीत असा खोचक सल्ला शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. मालवण शिवसेना शाखा येथे आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर हे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महेंद्र म्हाडगुत, बाळू नाटेकर, मोहन मराळ आदी उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, कोरोना महामारीचा सामना करताना राज्यातील आघाडी सरकारने आरोग्य विभागावर जास्त खर्च केला. यात जिल्ह्याला जास्त लाभ मिळाला याचे आम्हाला समाधान आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले तसेच कोव्हिड टेस्टिंग लॅब सुरू झाली. कोरोनावर नियंत्रण मिळविताना लॉकडाऊनमुळे थांबलेली विकास कामेही राज्यसरकार मार्गी लावत आहे. खड्डे पडलेल्या मालवण- कसाल रस्त्याचे काम लॉकडाऊन काळात होऊ शकले नाही. या रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामासाठी ४ कोटींचा निधी मंजूर असून आता हे काम डांबर प्लांट कार्यान्वित झाल्यावर लवकरच सुरू होणार आहे. तरीही केंद्र सरकारचे अपयश लपविण्यासाठी आणि आघाडी सरकार स्थिरावून चांगले काम करेल या भीतीने मालवण कसाल रस्त्यावर खड्ड्यांच्या प्रश्नावर भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. ही आंदोलने नुसत्या बोंबा मारण्याचे काम असून हे माहीत असल्याने त्यांना एका गावात लोकांनी आंदोलन करू न दिल्याने दुसऱ्या गावात आंदोलन करावे लागले. तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्ते कामाचे पोट ठेकेदार कोण हे भाजपवाल्यानी जाहीर करावे. डराव डराव करणाऱ्यांसोबत आम्ही थांबणार नाही, असा टोलाही खोबरेकर यांनी लगावला. वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय सुरू होण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. याबाबत लवकरच निर्णय होऊन वॉटर स्पोर्ट्स सुरू होतील अशी आशा खोबरेकर यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील जनतेसाठी ज्या सुविधा राज्यसरकारने आणल्या आहेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. मालवण ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस मशीन काही तांत्रिक अडचणींमुळे कार्यान्वित झालेली नाही. त्यासाठी स्वतंत्र पाण्याची पाईपलाईन जोडणी आवश्यक असून ती पूर्ण झाल्यावर मशीन कार्यान्वित होईल. जी कामे थांबली आहेत त्यांना चालना देण्याचा प्रयत्न आम्ही करू असेही खोबरेकर यावेळी म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page