*⚡मालवण ता.१३-:* निसर्गात लागवड न करता जंगलात, शेताच्या बांधावर,माळरानावर उगवणाऱ्या रानभाज्यामध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने तसेच औषधी गुणधर्म आढळून येत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने या रानभाज्याना महत्वाचे स्थान आहे म्हणूनच आपल्या आहारात रानभाज्याचा वापर करा असे प्रतिपादन मालवणचे तहसीलदार श्री अजय पाटणे यांनी येथे बोलताना केले महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कातवड येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजित करण्यात आले.त्यावेळी तहसीलदार पाटणे हे बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी गोसावी, सरपंच उदय नाईक, मनीषा वराडकर, आत्मा समिती अध्यक्ष उदय दुखंडे, आत्मा समिती सदस्य भाग्यश्री चव्हाण, उज्वला दळवी, गीता चौकेकर, ग्रामसेवक सौ युती चव्हाण, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी मालवण तालुका कृषी अधिकारी गोसावी यांनी स्वागत केले तर प्रस्तावीक मंडळ कृषी अधिकारी अतुल कांबळे यांनी केले यावेळी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी कोरोनाच्या काळातही लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे नीटनेटके आयोजन केल्याबद्दल कृषी विभागाचे कौतुक केले. मान्यवरांनी रानभाजी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच तालुक्यातील बारा महिला बचत गटांनी मांडलेल्या विविध पाककलाकृतींची पाहणी केली व सहभागी गटांना प्रमाणपत्राचे वितरण केले. यावेळी गटविकास अधिकारी श्री जयेंद्र जाधव यांनी शेती विकासाची संकल्पना उपस्थितांपुढे मांडली. मालवण तालुक्यातील कृषी विभाग नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी कार्यतत्पर असतो. अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यानी आयोजित करावेत, त्यास पदाधिकारी म्हणून आमचे नेहमीच सहकार्य लाभेल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी केले. महोत्सवादरम्यान रानभाज्यांचे आहारातील महत्व व संवर्धन या विषयावर कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे विषय विशेषज्ञ डॉ. विलास सावंत यांनी मार्गदर्शन केले तर धन्वंतरी संस्था आंबडोसचे वैद्य संदीप तळगावकर यांनी औषधी वनस्पतींची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातून दर्जेदार रानभाज्यांचे नमुने गोळा करण्यासाठी आचरा मंडळ कृषी अधिकारी अजित गवंडे, कृषी पर्यवेक्षक श्री सिताराम परब, कृषी सहाय्यक अमृता भोगले, विद्या कुबल, पवन सौंगडे, मिलिंद कदम, सुशीलकुमार शिंदे आदी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच सुरेश परब, सुजय घाडी, वैभव नाईक, अनिल सुकाळी, शिवराम चव्हाण, काशिनाथ चव्हाण, प्रभाकर सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय गावडे यांनी केले.
कातवड येथे रानभाजी महोत्सवप्रसंगी तहसीलदार अजय पाटणे यांचे प्रतिपादन
