केंद्र सरकारने १८ महिन्यांचा महागाई भत्ता ग्रामीण डाकसेवकांना द्यावा

ग्रामीण डाकसेवक संघटना सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष अभिमन्यू धुरी यांची मागणी

*⚡मालवण ता.१२-:* देशातील ३ लाख ग्रामीण डाक सेवकांना जानेवारी २०२० पासूनचा महागाई भत्त्याचा १८ महिन्याचा फरक मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने गेल्या १८ महिन्यांचा महागाई भत्ता ग्रामीण डाकसेवकांना द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटना सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष अभिमन्यू धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. संपूर्ण भारत देशात ३ लाख ग्रामीण डाक सेवक देशाच्या कानाकोपऱ्यात डाक पोचवण्याचे काम ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता आपले कार्य जनतेच्या प्रत्येकाच्या दारात जाऊन करीत आहेत. कोरोना महामारीच्या गेल्या १९ महिन्यांच्या कालावधीत ग्रामीण डाक सेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून भारतीय टपाल खात्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. या कर्मचाऱ्याना जुलै २०२१ च्या पगारात महागाई भत्ता केंद्र सरकारने वाढवून दिला. पण महागाई भत्त्याचा मागील १८ महिन्याचा ऑरीयस मिळालेला नाही. महागाई भत्ता मिळेल या आशेवर ग्रामीण डाक सेवक असून या प्रश्नी खासदार, आमदार यांनी लक्ष घालून ग्रामीण डाक सेवकावर झालेला अन्याय दूर करावा, असे अभिमन्यू धुरी यांनी म्हटले आहे. नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यामध्ये ग्रामीण टपाल जीवन विमा व पोस्टल लाईफ इन्शुरन्स या कामाची पोस्टमास्तर जनरल मुंबई यानी पडताळणी केली असता सर्वात उत्कृष्ट काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी केला असा गुणगौरव केला गेला. ग्रामीण टपाल जिवन विमा व पोष्टल लाईफ इन्शुरन्स मध्ये जिल्ह्याचा १ नंबर आला. याची खासदार व आमदार यांनी योग्य दखल घेवून त्यासाठी पाठपुरावा करत महागाई भत्त्याच्या (डी. ए.) फरकाची रक्कम गणेश चतुर्थी पूर्वी मिळवून द्यावी, असेही अभिमन्यू धुरी यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page