संजय यादवराव यांच्यासह तज्ञ होणार सहभागी
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* कोकण भुमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी स्थापन केलेल्या कोंकण महामार्ग समन्वय समितीचा अभ्यासदौरा १९ डिसेंबर रोजी खारेपाटण ते बांदा असा आयोजित करण्यात आला आहे. या समितीत श्री. यादवराव यांच्यासह अनेक तज्ञ उपस्थित राहणार आहेत. महामार्गाच्या कामांमधील त्रुटींची पाहणी करुन सविस्तर अहवाल शासनाला देऊन दर्जेदार महामार्गासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा हा प्रयत्न आहे, अशी माहिती समितीच्या सिंधुदुर्ग टिमचे समन्वयक सतीश लळीत यांनी दिली. याबाबत माहिती देताना श्री. लळीत म्हणाले की, मुंबई कोंकण महामार्गाच्या चारपदरी रुंदीकरणाचे काम गेली दहा वर्षे रखडत सुरु आहे. कोंकणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा या प्रकल्पाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. यामुळे उन्हाळी सुटीत किंवा गौरीगणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांना पुणे, कोल्हापूरमार्गे कोंकणात यावे लागते. याशिवाय सद्या जे अर्धवट काम झाले आहे, त्यामुळे वारंवार अपघात होऊन निरपराध नागरिक प्राणाला मुकत आहेत. पळस्पे (पनवेल) येथून सुरु होऊन बांदा (पत्रादेवी) येथे गोव्यात शिरणाऱ्या या महामार्गाच्या कामाची अवस्था चिड आणणारी आहे. महामार्गाच्या कामाची नेमकी स्थिती काय आहे, याची तटस्थपणे पाहणी करुन त्याबाबतचा अहवाल शासनाला देऊन यासाठी बिगर राजकीय जनआंदोलन उभारण्याचा निर्णय अलिकडेच समविचारी कार्यकर्त्यांनी एका ऑनलाईन बैठकीत घेतला. यावेळी श्री. यादवराव यांनी या समन्वय समितीची कल्पना मांडून त्याची कार्यवाही ७ डिसेंबरपासुन सुरु झाली. पळस्पे (पनवेल) ते बांदा या महामार्गाचे अभ्यासदौऱ्यासाठी चार टप्पे तयार करण्यात आले. पळस्पे ते पोलादपूर-खेड, खेड ते हातखंबा, हातखंबा ते खारेपाटण आणि खारेपाटण ते बांदा असे टप्पे करण्यात आले आहेत. पळस्पे ते पोलादपूर या पहिल्या टप्प्याचा अभ्यासदौरा नुकताच पार पडला. खेड ते हातखंबा या टप्प्याचा दौरा १७ डिसेंबरला, हातखंबा ते खारेपाटण या टप्प्याचा दौरा १८ डिसेंबरला आणि खारेपाटण ते बांदा या टप्प्याचा दौरा १९ डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे. या तिन्ही दौऱ्यात श्री. संजय यादवराव, हायवे क्षेत्रातील तज्ञ यशवंत पंडित, सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अधिकारी श्रीनिवास दळवी आणि जगदीश ठोसर उपस्थित राहणार आहेत. खारेपाटण ते बांदा या टप्प्यातील दौऱ्यात वरील मान्यवरांसोबत सिंधुदुर्ग टिमचे समन्वयक सतीश लळीत, पंडित रावराणे (वैभववाडी), समीर वाडेकर (देवगड) सहभागी होणार आहेत. दौऱ्याची सुरुवात खारेपाटण (मधुबन हॉटेल) येथुन सकाळी ८ वाजता होईल. तळेरे बसस्थानकासमोर (सकाळी ९-३०), नांदगाव (१०.३०), कणकवली (नरडवे रोड तिठा) (स. ११), कसाल बसस्थानकासमोर (दु. १२.३०), ओरोस फाटा (दु. १), कुडाळ (सत्यम हॉटेल) (दु. ३), साळगाव तिठा (सायं. ४), बांदा नाका (सायं. ५) असा हा अभ्यासदौरा असेल. या दौऱ्यादरम्यान त्यात्या ठिकाणच्या नागरिकांनी महामार्गाबाबतच्या सार्वजनिक तक्रारी किंवा मुद्दे मांडण्यासाठी उपस्थित रहावे. मात्र जमिनीची भरपाई, अतिक्रमण किंवा तत्सम वैयक्तिक कारणांसाठी भेटू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, या अभ्यासदौऱ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी १९ रोजी सकाळी आठ वाजता खारेपाटण (मधुबन हॉटेल) येथे स्वत:च्या वाहनव्यवस्थेसह उपस्थित रहावे, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. या अभ्यासदौऱ्यात रस्त्याच्या कामाचा दर्जा, सेवामार्ग, बसथांबे, पूल, उड्डाणपूल, अंडरपास, एक्झिट मार्ग, गावांचे नामफलक आदींची पाहणी केली जाणार आहे. याबाबतीत ज्या त्रुटी आढळतील, त्या दूर करण्यासाठी शासन व कंत्राटदाराकडे आग्रह धरला जाईल. उत्तम दर्जाचा महामार्ग हा कोंकणवासियांचा हक्क असल्याने त्यासाठी प्रसंगी लोकशाही मार्गाने जनआंदोलनही उभारण्यात येणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.