वैभववाडी तालुका इंधनामध्ये स्वयंपूर्ण होणार कॅन्सरमुक्त-केमिकलमुक्त सेंद्रिय शेती करणार

प्रगती पालांडे व पंढरीनाथ पवार यांनी दिली माहिती

*⚡वैभववाडी दि.१०-:* तालुक्यात “स्वच्छ इंधन-बायो फ्यूऐल,कॅन्सरमुक्त-केमिकलमुक्त सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय येथील जैविक उत्पादक कंपनीने घेतला आहे.त्यामुळे याठिकाणी आता इंधनाचे मळे फुलणार आहेत.याबाबतची माहिती कंपनीच्या संचालिका प्रगती पालांडे आणि उद्योग विकास सहाय्यक पंढरीनाथ पवार यांनी दिली.एमसीएल अंतर्गत मीरा क्लीन फ्यूएल लिमिटेड या केंद्र सरकारच्या मान्यतेने हा प्रकल्प होणार असून आता तालुका इंधनामध्ये स्वयंपूर्ण होण्याची शक्यता आहे. सदर प्रकल्पामुळे संपूर्ण तालुका इंधनामध्ये स्वयंपूर्ण करणार असून त्यामध्ये वाहतुकीचे स्वच्छ इंधन, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन, औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारे इंधन अशा आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मिती करणार आहे. मीरा क्लीनफ्युएल लिमीटेड इंधननिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच हत्ती गवत शेतातच निर्माण होणार असून शेतकऱ्यांसोबत करार शेती होणार आहे आणि शेतकऱ्यांकडून हमी भावाने हा कच्चा माल विकत घेतला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जमिन नसेल, त्यांच्यासाठी मीरा क्लीनफ्युएल लिमीटेड जैविक पशुपालन घेऊन आले आहे. त्यासाठी लागणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांना केली जाईल. मीरा क्लीनफ्युएल लिमीटेड या प्रकल्पामुळे अंदाजित २ हजार प्रत्यक्ष रोजगार व दीड हजार ते २ हजार अप्रत्यक्ष रोजगार आपल्या तालुक्यात निर्माण होणार आहेत. त्यामुळे तालुका, गाव सोडून नोकरीसाठी स्थलांतराची गरज आता राहणार नाही. या व्यवसायाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये शाश्वत व कायमचे असे कमीत कमी ५ हजार ते १० हजार रुपये महिना उत्पन्न मिळणार आहे. तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, कामगारांच्या, पदवीधारक तरुणांच्या, महिला बचत गटांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण संघटित होण्याची गरज आहे, असे एमपीओच्या संचालिका प्रगती पालांडे आणि उद्योग विकास सहाय्यक पंढरीनाथ पवार यांनी सांगितले.

You cannot copy content of this page